दुबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीलाआयसीसीच्या फलंदाजीच्या क्रमवारीतील अव्वल स्थान गमवावे लागले आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कोहलीने अव्वल स्थानाला गवसणी घातली होती. पण दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी न झाल्यामुळे त्याच्यावर अव्वल स्थान गमावण्याची वेळ आली आहे. ऑस्ट्रेलियाचा निलंबित कर्णधार स्टीव्हन स्मिथने पुन्हा एकदा क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
कोहलीने पहिल्या कसोटी सामन्यात 149 आणि 51 धावांची खेळी साकारली होती. या कसोटीत 200 धावा केल्यामुळे कोहलीच्या क्रमवारीतील गुणांमध्ये सुधारणा झाली होती. त्याच्या जोरावरच कोहलीने अव्वल स्थान पटकावले होते. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या सामन्यात कोहलीने 23 आणि 17 धावा केल्या. या निराशाजनक कामगिरीमुळे विराटची 15 गुणांनी घसरण झाली आणि तो आता 919 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
स्मिथवर आयसीसीने एका वर्षांनी बंदी घातली आहे. त्यामुळे तो वर्षभर आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळू शकणार नाही. पण सध्याच्या घडीला त्याच्या खात्यामध्ये 929 गुण असल्यामुळे तो अव्वल स्थानावरर पुन्हा एकदा पोहोचला आहे.