चेन्नई : माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने द. आफ्रिका दौ-यातील ढिसाळ कामगिरीबद्दल सध्याचा कर्णधार विराट कोहलीवर होत असलेला टीकेचा भडीमार योग्य नसल्याचे सांगून विराटची पाठराखण केली आहे. आमचा संघ २० बळी घेत असून संघाचे जे सकारात्मक पैलू आहेत त्यात गोलंदाजांची कामगिरी प्रमुख असल्याचे धोनीने सांगितले.चेन्नईत धोनी म्हणाला,‘ मी सध्या भारतीय संघाला सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देईन. एखादा कसोटी सामना जिंकण्यासाठी तुम्हाला २० बळी घेण्याची गरज असते, आणि दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी ही कामगिरी करून दाखविली आहे. तुम्ही २० बळी घेण्यात अपयशी ठरता अशावेळी सामना अनिर्णित राखण्याचा प्रयत्न करता. मात्र यंदाच्या दौºयात संघात असे काही घडले नाही. तो पुढे म्हणाला, ‘सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्या. आमचे गोलंदाज २० गडी बाद करीत आहेत. २० गडी बाद केले नाही तर सामना अनिर्णित राखण्याचा विचारही करू शकत नाही. शिवाय धावाही काढाव्या लागतील व प्रतिस्पर्धी फलंदाजांना धावा काढण्यापासून रोखावे लागेल. आमचे खेळाडू हे काम करीत असल्याने आम्ही विजयापासून अधिक दूर नाही.’
अश्विनला ‘सीएसके’त आणण्याचा प्रयत्नआयपीएल लिलावादरम्यान फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला पुन्हा चेन्नई सुपरकिंग्स संघात आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे धोनीने स्पष्ट केले. संघाने धोनी, रैना आणि जडेजा यांना रिटेन करण्याचा आधीच निर्णय घेतला. दोन वर्षांच्या बंदीनंतर सीएसके पुनरागमन करेल. अश्विन स्टार खेळाडू असून त्याचासारखा स्थानिक स्टार खेळाडू आमच्या संघात असावा अशी आमची इच्छा आहे, असे धोनी म्हणाला.