मुंबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत उपांत्य फेरी गाठू शकला नाही. या स्पर्धेनंतर विराट कोहलीनं टी-२० संघाचं कर्णधारपद सोडलं. या स्पर्धेनंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळदेखील संपला. टी-२० नंतर विराट कोहली एकदिवसीय सामन्यातही संघाचं कर्णधारपद सोडेल अशा चर्चा सुरू आहेत. यावर रवी शास्त्रींनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
कार्यभाराच्या अधिक उत्तम व्यवस्थापनासाठी अन्य फॉरमॅटमध्येही विराट कोहली नेतृत्त्वाची जबाबदारी सोडू शकतो, असं रवी शास्त्रींनी इंडिया टुडेला सांगितलं. 'कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ गेली ५ वर्षे पहिल्या क्रमांकावर आहे. जोपर्यंत मानसिक रुपानं थकवा जाणवत नाही, तोपर्यंत कोहली कर्णधारपद सोडेल, असं वाटत नाही. पण फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी तो भविष्यात कर्णधारपद सोडू शकतो,' असं शास्त्री म्हणाले.
'कोहली कसोटीचं कर्णधारपद सोडेल हे लगेच होणार नाही. पण असं घडू शकतं. सफेद चेंडूच्या क्रिकेटमध्येही (मर्यादित षटकांच्या सामन्यांत) हे होऊ शकतं. आता मला केवळ कसोटी कर्णधारपदाकडेच लक्ष द्यायचंय असं कोहली म्हणू शकतो,' असं शास्त्रींनी सांगितलं. बऱ्याच खेळाडूंनी फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडलं आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
रवी शास्त्रींनी विराट कोहलीच्या फिटनेसचं कौतुक केलं. 'कामगिरीत सुधारणा करण्याची भूक कोहलीकडे आहे. तो संघातील सर्वात फिट खेळाडू आहे. त्यात कोणतीही शंका नाही. जेव्हा तुम्ही शारिरीकदृष्ट्या फिट असता, तेव्हा तुमची कारकीर्ददेखील वाढते. कर्णधारपद कधी सोडायचं याचा निर्णय कोहलीचा असेल. तो मर्यादित षटकांमध्ये नेतृत्त्व सोडू शकतो. पण कसोटीत त्यानं खेळत राहायला हवं,' असं शास्त्री म्हणाले.