नवी दिल्ली : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) च्या स्पर्धेला उद्यापासून म्हणजेच शनिवारपासून सुरूवात होत आहे. या बहुचर्चित स्पर्धेसाठी एकूण 6 संघ सहभागी होणार असून सर्व संघ यूएईत दाखल झाले आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मोठ्या कालावधीनंतर क्रिकेट खेळत आहे. खराब फॉर्ममुळे त्याला अनेक टीकाकारांचा सामना करावा लागला होता. मात्र किंग कोहलीचा चाहता वर्ग खूप मोठा असून सध्या त्याचाच एक प्रत्यय देणारी व्हिडीओ समोर आली आहे. विराटची पाकिस्तानमधील जबरा फॅनने विराटला भेटण्याचे आपले आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण केले आहे.
दरम्यान, विराट भारतीय संघासोबत सरावात रमला आहे. अशातच पाकिस्तानमधील विराटची एक अपंग फॅन त्याला भेटण्यासाठी आली. भारताचा सलामीचा सामना आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे दोन्हीही संघ सरावात घाम गाळत आहेत. पाकिस्तानमधील फॅनने विराटला भेटल्यावर आनंद व्यक्त केला आहे. विराटला भेटून आपले आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे त्या अपंग फॅनने म्हटले.
विराटला भेटताच आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण "मी विराट वगळता कोणाचीच फॅन नाही, त्याच्यासाठी मी पाकिस्तानातून आले आहे आणि त्याच्यासोबत एक फोटो काढायचा आहे. यासाठी मी महिनाभर वाट पाहिली आहे. विराट सराव संपवून आला आणि परत जात असताना मी त्याला भेटण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याच्या हॉटेलमध्ये देखील जाण्याचे खूप प्रयत्न केले होते. तो एक उत्कृष्ट क्रिकेटर असण्याबरोबरच एक अप्रतिम व्यक्ती आहे. त्याने माझी इच्छा पूर्ण केली असून माझ्यासोबत एक सेल्फी काढली आहे," असे पाकिस्तानी फॅनने पाक टीव्हीशी बोलताना सांगितले.
आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.