India vs England 3rd Test ( Marathi News ) : भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेसाठीच्या उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा कधी केली जाईल, याची सर्वांना प्रतीक्षा आहे. विराट कोहलीचा पहल्या दोन कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी संघात समावेश केला गेला होता, परंतु वैयक्तिक कारण देत त्याने माघार घेतली. त्याच्या माघारीमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि तो सध्या BCCI च्या संपर्कातही नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीतही त्याच्या खेळण्याची शक्यता मावळत चालली आहे. उर्वरित कसोटींसाठी बीसीसीआय मागील आठवड्यातच संघ जाहीर करणार होता, परंतु विराटच्या संवादाची वाट पाहत बसल्याने त्याला विलंब झाला आहे.
विराटने जानेवारी २०२४ मध्ये शेवटचा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार विराट राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीलाही मुकण्याची शक्यता आहे. निवड समितीला अद्यात त्याच्या उपलब्धतेबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. त्यामुळे निवड समितीलाही संघ निवडीबाबत निर्णय घेता आलेला नाही.
दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि विराटचा जवळचा मित्र एबी डिव्हिलियर्सने एक मोठे विधान केले आहे. विराट आणि अनुष्का शर्मा लवकरच त्यांच्या दुसऱ्या पाल्याला जन्म देणार असल्याचे त्याने म्हटले आहे. मिस्टर ३६० त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. शिवाय सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती आणि त्यानुसार आईची प्रकृती खालावल्यामुळे विराटने माघार घेतल्याचा दावा केला गेला होता. मात्र यावर विराटच्या भावाने स्पष्टीकरण देऊन या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
विराटचा भाऊ विकास याने हे वृत्त खोडून काढताना सांगितले होते की, आईच्या प्रकृतीवरून काही चुकीच्या बातम्या पसरत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. मला हे स्पष्ट करू द्या की आईची प्रकृती चांगली आहे. माझी लोकांना आणि खासकरून माध्यमांना विनंती आहे की कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता अशा बातम्या पसरवू नका.