भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होणाऱ्या वन डे मालिकेतून माघार घेतल्याचे वृत्त मंगळवारी येऊन धडकले. भारतीय संघ तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे, परंतु कुटुंबियांना वेळ देण्यासाठी कोहलीनं हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पण, रोहित शर्माला वन डे संघाचा कर्णधार बनवल्यानं कोहली नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. त्यात काँग्रेसचे खासदार व प्रसिद्ध वकील अभिषेक सिंघवी ( Abhishek Singhvi ) यांनीही विराटच्या या माघारीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
भारतीय संघ १६ डिसेंबरला आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. २६ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार असून तीन सामन्यांच्या मालिकेनंतर वन डे मालिका होणार आहे. पण, विराटनं वन डे मालिकेसाठी त्याच्या नावाचा विचार करू नका, असे बीसीसीआयला कळवले आहे. रोहितनं दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली आणि त्यात आता विराटच्या या निर्णयामुळे टीम इंडियात सारे काही आलबेल नसल्याचेच दर्शवते आहे. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू असताना सिंघवी यांनीही टीका केली.
त्यांनी ट्विट केलं की,''बाळाच्या जन्मासाठी विराट कोहलीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून विश्रांती घेतली हे समजू शकतो, पण लहर आली म्हणून दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेणे, हे समजण्यापलीकडचे आहे. त्यानं भारतीय संघातील त्याच्या स्थानाला प्राधान्य द्यायला हवं होतं, जर तू तसं करत नसशील मग प्रश्न हे विचारले जाणारच.''
या चर्चांवर BCCIच्या अधिकाऱ्यानं महत्त्वाचं विधान केलं. तो म्हणाला,वन डे मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचे विराटनं कळवले आहे. त्याला कुटुंबियांसोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नका. विराट व रोहित यांच्यात मतभेद नाही.