मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी 2018 हे वर्ष फारच फलदायी ठरले आहे. मैदानावरील त्याची कामगिरी दिवसेंदिवस बहरतच चालली आहे. त्यामुळेच त्याच्यामागे जाहीरातदारांचीही रिघ लागली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून कोहलीने वर्षाची दमदार सुरुवात केली होती आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शेवटही तसाच करण्याचा त्याचा निर्धार आहे. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम त्याला पराक्रम त्याला करायचा आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही कोहली विक्रमांचा पाऊस पाडेल, याबाबत कोणालाही शंका नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी कोहलीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्य भारतीय सेलिब्रिटींमध्ये बॉलिवूडचा दबंग नायक सलमान खान याच्यापाठोपाठ कोहलीने दुसरे स्थान पटकावले आहे. खेळाडूंमध्ये कोहली अव्वल स्थानावर आहे.
फोर्ब्सने 2017 मध्ये जाहीर केलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत कोहली 100.72 कोटींच्या कमाईसह दुसऱ्या स्थानावर होता. यावेळी कोहलीच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली आहे. यंदा तो 228.09 कोटी रुपयांच्या कमाईसह दुसऱ्या स्थानी आहे. त्याच्या या कमाईत बीसीसीआयच्या करारातून मिळणारे उत्पन्न, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून मिळणारे मानधन याचा मोठा वाटा आहे. त्याशिवाय जाहिरातीतूनही त्याला बरेच उत्पन्न मिळते.
कोहलीपाठोपाठ सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा क्रमांक येतो. विशेष बाब म्हणजे बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू चौथ्या स्थानावर आहे आणि दहा अव्वल खेळाडूंमध्ये स्थान पटकावणारी ती दुसरी महिला खेळाडू आहे. फुलराणी सायना नेहवाल 10व्या स्थानावर आहे. मनिष पांडे, जसप्रीत बुमरा यांनी प्रथमच या यादीत स्थान पटकावले आहे. बुमराने 60वे, तर पांडेने 77 वे स्थान पटकावले आहे.
सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू पुढीलप्रमाणे...
हार्दिक पांड्यानेही कमाईच्या बाबतित मोठी झेप घेतली आहे. गतवर्षी 3.04 कोटी कमावणाऱ्या हार्दिकला यंदा 28.46 कोटी मिळत आहेत. त्याच्या कमाईचा आकडा 800 टक्क्यांनी वाढला आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या 100 सेलिब्रिटींमध्ये 21 खेळाडूंनी स्थान पटकावले आहे.