India vs England Test Series : लॉर्ड्सवर टीम इंडियाकडून झालेला पराभव इंग्लंडचा जास्तच जिव्हारी लागला आहे. इंग्लंडकडून जो रूट व जेम्स अँडरसन यांच्याकडून संघर्ष पाहायला मिळाला, तर टीम इंडियाच्या सर्व शिलेदारांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. त्यामुळेच लॉर्ड्सवर १५१ धावांनी यजमानांना पराभव पत्करावा लागला आणि मालिकेत ते ०-१ असे पिछाडीवर फेकले गेले आहेत. इंग्लंडच्या या पराभवानंतर माजी खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्यावर टीका करत आहेत. विराटच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. त्यात इंग्लंडचा माजी खेळाडू निक कॉम्पटन यानं तर विराटला 'फाटक्या तोंडाचा' म्हणून त्याच्या आक्रमकतेबाबत बेताल वक्तव्य केले. ( former England cricketer Nick Compton feels the India skipper 'the most foul mouthed individual')
विराट कोहलीची मैदानावरील आक्रमकता ही भारतीय चाहत्यांना आवडत असली तरी प्रतिस्पर्धी त्याकडे अखिलाडूवृत्ती म्हणूनच पाहतात. आरे ला कारे करण्याचा विराटचा स्वभावच आहे आणि त्यामुळे सहकाऱ्यांमधीलही जोश सामन्यात वाढतोच. लॉर्ड्स कसोटीत विराटच्या फलंदाजीपेक्षा त्याच्या याच आक्रमकतेची चर्चा अधिक रंगली. त्यानं केवळ इंग्लंडच्याच खेळाडूंना नव्हे तर भारतीय खेळाडूंनाही शब्दान धारेवर धरले. कॉम्पटन यांची ही टीका कोहलीच्या चाहत्यांना रूचली नाही. त्यांनी इंग्लंडच्या खेळाडूंच्या अखिलाडूवृत्तीची अनेक उदाहरणं दिली. कॉम्पटन यांनी नंतर ते ट्विट डिलीट केले.