ICC T20 batsman ranking - विराट कोहलीने १०२१ दिवसांचा आंतरराष्ट्रीय शतकाचा दुष्काळ आशिया चषक २०२२ स्पर्धेत संपुष्टात आणला. अफगाणिस्तानविरुदच्या त्याच्या ६१ चेंडूंतील १२२ धावांच्या खेळीने भारतीयांना आनंदीत केले. शिवाय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी विराटचा फॉर्म परतल्याने सारेच खुश झाले. त्यात आयसीसीलाही विराटच्या शतकाही दखल घ्यावी लागली आहे. आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० क्रमावरीत भारताचा स्टार विराट आणि श्रीलंकेचा अष्टपैलू वनिंदू हसरंगा यांनी मोठी झेप घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता Virat Kohliचा आशियात डंका; 'या' बाबतीत नोंदवला मोठा विक्रम
आशिया चषक स्पर्धेपूर्वी ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत २९व्या क्रमांकावर असलेल्या कोहलीने १४ स्थानांची झेप घेतली. कोहलीने शतकासह २७६ धावा करून आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत दुसरे स्थान पटकावले. त्यामुळे आता तो जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानावर आहे. सूर्यकुमार यादव चौथ्या व रोहित शर्मा चौदाव्या क्रमांकावर आहे. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये टॉप १५ मध्ये विराट व रोहित हे दोन भारतीय खेळाडू कायम आहेत. वनिंदू हसरंगानेही गोलंदाजांच्या क्रमावारीत ३ स्थानांच्या सुधारणेसह सहावे, तर अष्टपैलूंमध्ये चौथे क्रमांक पटकावले आहे. वनिंदूनला आशिया चषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविले आणि अंतिम सामन्यात त्याने तीन महत्त्वाच्या विकेट्स घेत सामना फिरवला .
बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन हा ट्वेंटी-२०त नंबर १ अष्टपैलू खेळाडू बनला आहे. त्याने अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीला मागे टाकले. भारताचा लोकेश राहुल फलंदाजांमध्ये ७ स्थानाच्या सुधारणेसह २३व्या आणि श्रीलंकेचा भानुका राजपक्षा ३४ स्थानांच्या सुधारणेसह ३४व्या क्रमांकावर आला आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान नंबर १चा फलंदाज आहे. एडन मार्कराम व बाबर आजम हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बाबरने दुसरे स्थान गमावले. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमारनेही चार स्थानांच्या सुधारणेसह सातवा क्रमांक काढला आहे.
कसोटी संघ क्रमवारीत बदल झालेला नाही. फलंदाजांमध्ये इग्लंडच्या ऑली पोपने १७ स्थानांच्या सुधारणेसह २९वे क्रमांक पटकावले आहे. ऑली रॉबिन्सनही गोलंदाजांमध्ये ११ स्थानांची झेप घेत १५व्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडने ०-१ अशा पिछाडीवरून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली आहे.