ICC ranking : भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावली असली तरी माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं त्या मालिकेत समाधानकारक कामगिरी केली. दुसऱ्या कसोटीत त्याला कंबरेत उसण भरल्यामुळे खेळता आले नव्हते. केपटाऊन कसोटीत त्यानं ७९ धावांची खेळी केली होती आणि त्यामुळे त्यानं आयसीसी कसोटी क्रमवारीत दोन स्थानांची सुधारणा करताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याला चीतपट केलं आहे. ऑस्ट्रेलियचा फलंदाज ट्रॅव्हीस हेड, टॉम लॅथम आणि कागिसो रबाडा यांनीही क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
अॅशेस मालिकेतील मालिकावीर हेडनं सात स्थानांच्या सुधारणेसह रोहित शर्मासोबत पाचवे स्थान वाटून घेतले आहे. भारताचा माजी कर्णधार विराट हा दोन स्थानांच्या सुधारणेसह सातव्या क्रमांकावर आला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम यानंही टॉप टेनमध्ये एन्ट्री घेतली आहे. तो १०व्या स्थानावर आहे आणि बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्यानं द्विशतक झळकावले होते.
गोलंदाजी विभागात दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा यानं पाचव्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. जसप्रीत बुमराहनंही केपटाऊन कसोटीत पाच विकेट्स घेतल्या होत्या आणि तो अव्वल दहा गोलंदाजांमध्ये परतला आहे. त्यानं तीन स्थानांच्या सुधारणेसह १०वा क्रमांक पटकावला आहे.