महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या मुलींवर गलिच्छ कमेंट करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईची तयारी केली आहे. सोशल मीडियावर गलिच्छ कमेंट करणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास देखील सुरू केला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्या ट्विटनंतर पोलिसांनी कारवाई केली आणि गुन्हा दाखल केला. यासोबतच ट्विटरला संबंधित हँडल्सची माहिती देण्यासाठीची नोटीसही बजावण्यात आली आहे.
नुकतंच स्वाती मालीवाल यांनी कोहली आणि धोनीच्या मुलींबद्दल असभ्य टिप्पणी करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची नोटीस बजावली होती. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या मुलीचा दुसरा वाढदिवस साजरा केला. त्यांनी मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यावर काही युजर्सनी अश्लील कमेंट केल्या होत्या. ते पाहून स्वाती यांनी संताप व्यक्त केला. स्वाती मालिवाल यांनी ट्विट करत अश्लील टिप्पणी करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट पोस्ट केले होते. "ट्विटरवर काही अकाऊंट्सकडून विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्या मुलींच्या फोटोंवर अश्लील कमेंट केल्या जात आहेत. २ वर्ष आणि ७ वर्षांच्या मुलींसाठी इतक्या वाईट कमेंट्स का करता? तुम्हाला खेळाडू आवडत नसतील तर तुम्ही त्यांच्या मुलींवर अत्याचार करणार का?", असा सवाल उपस्थित करत मालिवाल यांनी नाराजी व्यक्त केली होती.
'स्पेशल सेल' युनिटने दाखल केला गुन्हास्वाती मालीवाल यांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिसांना नोटीस पाठवली. स्वाती मालीवाल यांची नोटीस मिळाल्यानंतर, विशेष सेलच्या IFSO युनिटने गुन्ह्याची नोंद केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वाती यांनी दोषी लवकरच तुरुंगात जातील असा विश्वास व्यक्त केला आहे.