ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पराभवानंतर बीसीसीआयने काही कठोर निर्णय घेतले आहेत. त्यात प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नव्या नियमावलीनुसार, भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मासह अनेक स्टार रणजी ट्रॉफी खेळताना दिसले. पण विराट कोहली मात्र देशांतर्गत क्रिकेटपासून दूर राहिल्याचे पाहायला मिळाले. पण आता तोही देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरण्याचं पक्क झालं आहे. युवा आयुष बडोनीच्या नेतृत्वाखाली तो दिल्ली संघाकडून खेळताना दिसेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट कोहली कधी अन् कुणाविरुद्ध खेळणार रणजी सामना?
३० जानेवारीला दिल्लीचा संघ ग्रुप डी मधील रेल्वे संघाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या सामन्यात विराट कोहलीही खेळताना दिसेल. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियवर खेळवण्यात येणार आहे. विराट कोहली १२ वर्षांपेक्षा अधिक काळानंतर रणजी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. तो जवळपास ४ हजार ४७२ दिवसांनी देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसेल.
रोहित-जड्डूसह अनेक स्टार खेळले, पण मान दुखावल्यामुळे विराट नाही दिसला
याआधी रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुूबमन गिल आणि रवींद्र जडेजा हे स्टार २३ जानेवारीपासून रंगलेल्या सामन्यात खेळताना दिसले होते. त्यावेळी विराटही मैदानात उतरेल, अशी अपेक्षा होती. पण रणजी खेळण्याची वेळ आल्यावर त्याच्या मानेच्या दुखापतीमुळे तो याआधीच्या मॅचला मुकला होता. त्यावेळी पंतच्या उपस्थितीत दिल्लीच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पुढच्या सामन्यात पंत संघाबाहेर पडला असून विराट कोहलीची दिल्लीच्या संघात एन्ट्री झाली आहे.
विराट कोहलीनं कधी खेळला होता अखारचे रणजी सामना?
विराट कोहलीनं अखेरचा रणजी सामना हा नोव्हेंबर २०१२ मध्ये खेळला होता. त्यावेळी विद्यमान कोच गौतम गंभीर, माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग आणि ईशांत शर्माही त्या मॅचचा भाग होते. रणजी करंडत स्पर्धेत विरा कोहलीनं २३ सामन्यात जवळपास ५० च्या सरासरीनं १५७४ धावा केल्या आहेत.
पर्थमध्ये विराटच्या भात्यातून एक सेंच्युरी आली, पण..
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पर्थ कसोटीत विराट कोहलीच्या भात्यातून दमदार शतक पाहायला मिळाले होते. पण त्यानंतर मात्र त्याच्या भात्यातून धावा झाल्या नाहीत. ज्याची मोठी किंमत टीम इंडियाला पराभवाने मोजावी लागली. चॅम्पियन्स ट्रॉफी आधी रणजी आणि त्यानंतर विराट कोहली इंग्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यात खेळताना दिसेल. या सामन्यातील त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील.
Web Title: Virat Kohli Named In Delhi's Ranji Trophy Squad No Rishabh Pant Ayush Badoni To Remain Captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.