नवी दिल्ली: विराट कोहलीच्या ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकाची वाट केवळ त्याचे चाहतेच नाहीत, तर अनेक दिग्गज खेळाडूही पाहत आहेत. मात्र विराटला शतक झळकावण्यात अपयश येत आहे. कोहलीला गेल्या २८ महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक साजरं करता आलेलं नाही. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहलीला अर्धशतकही करता आलं नाही.
विराट कोहली सातत्यानं अपयशी ठरत असल्यानं त्याची कसोटी क्रिकेटमधील सरासरी ५० च्या खाली आली आहे. ५ वर्षांत प्रथमच कोहलीची कसोटी सरासरी ५० च्या खाली घसरली आहे. कोहलीला मोठी खेळी रचण्यात सातत्यानं अपयश येत आहे. त्यानंतर आता त्याच्या लहानपणीच्या प्रशिक्षकांनी त्याला मोलाचा सल्ला दिला आहे. कोहलीनं पुन्हा अकादमीत परतायला हवं. आती ती वेळ आलेली आहे. विराटनं आता फलंदाजीतील बेसिक्सवर काम करायला हवं, असं विराटचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा म्हणाले.
विराटनं बेसिक्सवर लक्ष केंद्रीत करायला हवं. त्यानं अकादमीत यावं असं मला वाटतं. मी कालपासूनच याबद्दल विचार करत आहे. आता याबद्दल विराटशी बोलेन. कोहलीला अकादमीत जो आत्मविश्वास मिळतो, तो आता त्याच्यासाठी अतिशय गरजेचा असल्याचं शर्मा यांनी खेलनीती नावाच्या एका यूट्यूब चॅनलला सांगितलं.
विराट कोहली चांगली फलंदाजी करत आहे. मात्र तो गरजेपेक्षा जास्त सतर्कता बाळगत आहे. त्यानं मोकळेपणानं फलंदाजी करायला हवी. करियरच्या सुरुवातीला ज्याप्रकारे तो मोकळेपणानं खेळायचा, त्याचप्रकारे त्यानं खेळायला हवं. बंगळुरूसारख्या खेळपट्ट्यांवर तुम्हाला थोडी जोखीम पत्करावी लागते. ती जोखीम श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतनं पत्करली, असं शर्मा म्हणाले.