Virat Kohli, Champions Trophy 2025 : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळला आणि लाजिरवाणा पराभव स्वीकारून भारतात परतला. त्यानंतर बीसीसीआयने सर्व करारबद्ध क्रिकेटपटूंना देशांतर्गत सामने खेळणे बंधनकारक केले. बीसीसीआयच्या नवीन नियमांनुसार रोहित शर्मा, रिषभ पंत, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा या सर्व खेळाडूंनी रणजीसाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले; मात्र विराट कोहलीबाबत संभ्रम आहे. त्याचा दिल्ली संघात समावेश करण्यात आला आहे, पण त्याच्या दुखापतीवर त्याचा संघातील समावेश अवलंबून आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी त्याला फॉर्ममध्ये परतायचे असल्यास रणजीमध्ये खेळणे गरजेचेच होते. अशातच, विराटचा माजी सहकारी आणि RCBकडून खेळलेला माजी फलंदाज मोहम्मद कैफ याने एक अतिशय धाडसी विधान केले आहे.
"विराट कोहली कधीच मान्य करत नाही की तो हरलाय. कारण तो अतिशय झुंजार वृत्तीचा खेळाडू आहे. वाईट काळावर मात करून दमदार पुनरागमन करण्याची त्याची शैली आहे. त्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये विराटला कमी लेखून चालणार नाही. त्याच्या नावावर या फॉरमॅटमध्ये पन्नास शतके आहेत आणि १३ हजार धावा आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियात काय घडलं हे विसरून जा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी करा," अशी रोखठोक भूमिका कैफ याने मांडली.
"विराट कोहली हा कसोटी क्रिकेटपेक्षा वन-डे क्रिकेटमध्ये खूपच वेगळ्या पद्धतीने खेळतो. मागच्या वेळी जेव्हा कोहली दुबईमध्ये निर्धारित षटकांचा सामना खेळला होता, तेव्हा त्याने ६१ चेंडूत नाबाद १२२ धावांची खेळी केली होती. अफगाणिस्तान विरुद्धच्या या सामन्यात त्याने सहा षटकार ठोकले होते. त्यावेळी त्याचा फॉर्म सर्वोत्तम होता आणि त्याला दुबईत खेळायला आवडते. त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफी दरम्यानही तो अशाच प्रकारची कमाल करून दाखवू शकतो यावर सर्वांनाच विश्वास आहे," असा आशावादही मोहम्मद कैफने व्यक्त केला.
दरम्यान, आगामी रणजी सामन्यासाठी दिल्लीने २२ जणांचा संघ घोषित केला असून, यात विराट कोहली सह ऋषभ पंतचाही समावेश आहे. संघाचे कर्णधारपद आयुष बडोनीकडे आहे. रिषभ आणि विराट आयुषच्या नेतृत्वात खेळणार आहेत. दिल्लीला २३ जानेवारीपासून सौराष्ट्र संघाविरुद्ध खेळायचे आहे. तर ३० जानेवारीपासून रेल्वे विरुद्ध सामना खेळायचा आहे. यातील कुठल्या सामन्यात विराट खेळतो याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.