मुंबई - आयसीसी टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झाली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे भारताचे आव्हान सुपर १२ फेरीत संपुष्टात आले आहे. दरम्यान, पारिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर सोशल मीडियावरून विराट कोहलीच्या मुलीवर बलात्काराचा धमकी देण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आरोपीला बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रामनागेश अलिबथिनी आहे. तो इंजिनियर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विराटच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणाऱ्या आरोपीला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी हा इंजिनियर असल्याचे समोर आले आहे. तसेच तो फूड डिलिव्हरी अॅपसाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सलामीच्या लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानकडून पराभव झाला होता. त्यानंतर काही जणांनी या पराभवासाठी मोहम्मद शमीला जबाबदार धरले होते. तेव्हा विराट कोहलीने पुढे येत शमीची बाजू घेताना त्याच्यावर टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर सोशल मीडियावरील ट्रोलर्सनी विराट कोहलीलाही लक्ष्य केले होते. तसेच त्यात एकाने थेट विराट कोहलीच्या अवघ्या दहा महिन्यांच्या लेकीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. ही बाब समोर आल्यावर त्याविरोधात संतापाची लाट उसळली होती. तसेच संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यानुसार अखेर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपीला बेड्या ठोकल्या.