मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आज 30 व्या वर्षात पदार्पण करत आहे. क्रिकेटच्या मैदानावर कोहली विक्रमांचे अनेक शिखर पादाक्रांत करत आहे. मात्र, धावांचे विक्रम रचणारा कोहली अभ्यासात पिछाडीवर होता. आज त्याच्या विक्रमांची बेरीज करताना भल्याभल्यांची दमछाक होते. कोहलीचीही एकेकाळी आकडेमोड करताना तारांबळ उडायची.
मैदानावर चौकार व षटकारांची आतषबाजी करणारा कोहली 12वी पर्यंतच शिकला आहे. क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अभ्यासाकडे पाठ फिरवली आणि क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या तयारीला लागला. कोहलीने दिल्लीच्या विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. शाळेत अजूनही त्याचे फोटो लावलेली आहेत. त्याने शाळेत असताना अनेक पुरस्कारही जिंकले आहेत.
कोहलीला इतिहास हा विषय फार आवडायचा. हे ऐकून त्याच्या चाहत्यांना आश्चर्य वाटत असले तरी हे खरं आहे. त्याला इतिहासाबाबत जाणून घेणे, नेहमी आवडायचे. पण, अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे गणित हा त्याचा नावडता विषय होता. त्याला गणितात 100 पैकी तीन मार्क मिळाले होते, परंतु त्याच्या विक्रमांची आकडेमोड करताना आज अनेकांची दमछाक होत आहे.
कोहलीने लहानपणापासूनच महान फलंदाज सचिन तेंडुलकरसारखा अव्वल फलंदाज होण्याचे मनाशी पक्के केले होते. क्रिकेटप्रती असलेले त्याचे वेड लक्षात घेता वडिलांनी त्याला 9व्या वर्षी क्रिकेट प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले. 2006 साली तो जेव्हा राहुल द्रविडला भेटला त्यावेळी त्याचे डोळे भरून आले होते.