मुंबईः गेली पाच वर्षं रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारा विराट कोहली हा आयपीएलमधील सगळ्यात अपयशी कर्णधार असल्याचं समोर आलं आहे. ५० हून अधिक सामन्यांत कर्णधार राहिलेल्या वीरांची विजयाची टक्केवारी पाहता, कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी अव्वल आहे, तर विराट शेवटून पहिला. ८८ सामन्यांत विराटनं बेंगलोरचं नेतृत्व केलं असून त्याला ४१ सामने जिंकवता आलेत आणि ४४ सामन्यांत संघाला पराभव पत्करावा लागलाय.
टीम इंडियाला जिंकण्याची सवय लावणारा कर्णधार म्हणून विराट कोहलीकडे पाहिलं जातं. महेंद्रसिंह धोनीकडून कोहलीनं भारताच्या कसोटी आणि वनडे कर्णधारपदाची सूत्रं स्वीकारली. त्यानंतर, देश-विदेशातील अनेक मालिकांमध्ये टीम इंडिया अजिंक्य राहिली आहे. सलग नऊ मालिका जिंकण्याचा पराक्रम भारताने केला आहे. पण, ज्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इतकी विराट कामगिरी करतेय, तो कोहली आयपीएलमधील कर्णधारांच्या यादीत सगळ्यात खाली आहे.
२०११ मध्ये उपविजेता ठरलेला बेंगलोरचा संघ २०१२ मध्ये पाचव्या स्थानी राहिला. त्यावेळी विराट कोहली हा व्यवस्थापनाला आशेचा किरण वाटला आणि त्यांनी कर्णधारपदाची माळ या वीराच्या गळ्यात घातली. पण, २०१३ मध्ये रॉयल चॅलेजर्सना प्ले-ऑफपर्यंत पोहोचता आलं नाही. २०१४ मध्ये तर ते सातव्या स्थानावर फेकले गेले. २०१५ मध्ये त्यांनी सेमी-फायनलपर्यंत धडक मारली, पण जेतेपदाचं स्वप्न साकार झालं नाही. २०१६ मध्येही जेतेपदानं त्यांना हुलकावणी दिली होती. त्यानंतर, गेल्या वर्षी तर ते तळाला राहिले होते आणि यंदाही विराटसेनेची अवस्था बिकटच आहे.
या पार्श्वभूमीवर, आयपीएल स्पर्धेत ५० हून अधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलेल्या रथी-महारथींच्या कामगिरीची समीक्षा केली असता, विजयाच्या टक्केवारीत विराट कोहली तळाला असल्याचं दिसतं. या यादीत कोण कुठे आहे बघूया...
कर्णधार | सामने | विजय | पराभव | नो-रिझल्ट | टक्केवारी | जेतेपदं |
महेंद्रसिंह धोनी | १४९ | ८८ | ६० | १ | ५९.०६ | २ |
सचिन तेंडुलकर | ५१ | ३० | २१ | - | ५८.८२ | - |
रोहित शर्मा | ८१ | ४७ | ३४ | - | ५८.०२ | ३ |
शेन वॉर्न | ५५ | ३१ | २४ | - | ५६.३६ | १ |
गौतम गंभीर | १२९ | ७१ | ५८ | - | ५५.०४ | २ |
वीरेंद्र सेहवाग | ५३ | २९ | २४ | - | ५४.७२ | - |
अॅडम गिलख्रिस्ट | ७४ | ३५ | ३९ | - | ४७.३० | १ |
विराट कोहली | ८८ | ४१ | ४४ | ३ | ४६.५९ | - |
(आकडेवारी सौजन्यः मुंबई मिरर)