नवी दिल्ली: टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा आज विराट कोहलीनं केली. विराटच्या अनपेक्षित घोषणेनं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहली टी-२० सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्त्व करताना दिसणार नाही. गेल्या ५-६ वर्षांपासून तिन्ही प्रकारात नेतृत्त्व करत असल्यानं आता मला स्वत:साठी थोडा वेळ हवा आहे, असं म्हणत विराटनं टी-२० मधील नेतृत्त्व सोडणार असल्याची घोषणा केली. यावर आता माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी भाष्य केलं आहे.
बहुधा विराट कोहलीच्या टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांतील नेतृत्त्वावर बीसीसीआय आणि निवड समिती समाधानी नाही. त्यामुळेच विराटनं एका फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असावा, असं गावस्कर म्हणाले. 'मी विराटची पोस्ट वाचली. विराट कोहलीनं रवी शास्त्री, रोहित शर्मा, सौरव गांगुली आणि निवड समितीसोबत बरीच चर्चा केल्यानंतर टी-२० सामन्यांमधील नेतृत्त्व सोडण्याचा निर्णय घेतला. गेल्या ६ महिन्यांपासून त्याच्या टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांतील नेतृत्त्वाबद्दल बरीच चर्चा सुरू होती. बीसीसीआय आणि निवड समिती आपल्या नेतृत्त्वावर समाधानी नाहीत, याची कल्पना विराटला असावी. त्यामुळेच त्यानं टी-२०चं कर्णधारपद सोडलं असावं,' असं गावस्कर म्हणाले.वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीनं केलं जाहीर
विराट कोहलीचं एकदिवसीय सामन्यातलं नेतृत्त्वदेखील संकटात असल्याचं गावस्कर अप्रत्यक्षपणे म्हणाले. 'एकदिवसीय आणि कसोटी भारतीय संघाचं नेतृत्त्व पुढेही करू इच्छित असल्याचं विराटनं पोस्टमध्ये म्हटलं. मात्र आता त्याच्या एकदिवसीय सामन्यांतील नेतृत्त्वावर निवड समिती निर्णय घेईल. त्याच्या कसोटी नेतृत्त्वाबद्दल कोणतंही प्रश्नचिन्ह नाही. मात्र एकदिवसीय सामन्यातील नेतृत्त्व बदलतं की नाही ते पाहावं लागेल,' असं गावस्कर यांनी सांगितलं.