T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा सलग दुसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभव झाला. पाकिस्तानंतर न्यूझीलंडनंही भारताला नमवलं. या पराभवानंतर भारतीय संघाचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग आता खडतर झाला आहे. भारतीय संघाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीचं एक १० वर्ष जुनं ट्विट आता चर्चेचा विषय ठरत आहे. पराभवानं दु:खी झाल्यानं मायदेशी परत जाण्याबाबतचं एक ट्विट कोहलीनं केलं होतं. तेच ट्विट आता पुन्हा एकदा व्हायरल झालं आहे.
भारतीय संघाचा पराभवानंतर विराट कोहलीला टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कोहली सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यातच त्याचं एक ट्विट व्हायरल झालं आहे. "पराभवानं मी खूप दु:खी झालो आहे. आता घरी जातोय", असं एक ट्विट २३ जानेवारी २०११ रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास केलं होतं. याच ट्विटवर आता नव्यानं फॅन्स रिप्लाय देऊ लागले आहेत.
काहींनी जय-पराजय होतच असतो असं म्हणत कोहलीला पाठिंबा देऊ केलाय तर काहींनी सडकून टीका केलीय. अभिनेता अक्षय कुमारशी बोलून एखाद्या चित्रपटात एखादा वर्ल्डकप जिंकल्याचं दाखवता येऊ शकतं असा खोचक टोला काहींनी लगावला आहे. काहींनी तर कोहलीला थेट भूमिगत होण्याचा सल्ला दिला आहे. कोहलीनं खेळातील घमेंडीपणा आता बाजूला टाकावा असंही काहींनी म्हटलं आहे.
कोहलीच्या कर्णधारपदावर याआधीपासूनच टीका होत आली आहे. पण यावेळी कोहलीनं वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्याआधीच ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून कर्णधारपद सोडून देणार असल्याचं जाहीर केलं आहे. यातच न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ज्यापद्धतीनं फलंदाजी क्रमवारीत बदल केला गेला त्यावरुनही कोहलीवर निशाणा साधला जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या जागी इशान किशन याला सलामीला पाठवण्यात आलं होतं. तर रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.