नवी दिल्ली-
भारतीय कसोटी क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर अखेर विराट कोहलीनं आपलं मौन सोडलं आहे. लीडर होण्यासाठी तुम्ही संघाचं कर्णधारच असायला हवं असं काही नाही, असं विराट कोहलीनं एका कार्यक्रमात म्हटलं आहे. द.आफ्रिके विरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीनं भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. याआधी कोहलीनं वनडे आणि ट्वेन्टी-२० संघाचंही कोर्णधारपद सोडलं आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या मतानुसार तुमचं लक्ष्य काय आहे याबाबत तुमचे विचार स्पष्ट असायला हवेत. ते तुम्ही पूर्ण करू शकला की नाही हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. तुम्हाला अशा गोष्टींची काळजी घ्यावी लागते. एक फलंदाज म्हणून मी कदाचित संघाला अधिक योगदान देऊ शकतो. त्यामुळे यावर खरंतर अभिमान व्यक्त करायला हवा, असं विराट कोहली म्हणाला.
कोहलीनं दिलं धोनीचं उदाहरणनेतृत्त्व करण्यासाठी तुम्ही कर्णधारच असायला हवं असं काही नाही, असं कोहलीनं म्हटलं. जेव्हा एमएस धोनी संघात होता याचा अर्थ तो लीडर नाही असा होत नाही. कर्णधारपद सोडल्यानंतरही तो एक असा व्यक्ती होता की संघातील प्रत्येक जण त्याच्याकडून सल्ला घेत होतं. त्याची गरज भासायची. जय-पराजय तुमच्या हातात नाही, पण प्रत्येक दिवस उत्तम असावा यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता, असं कोहली म्हणाला.
आयुष्यात पुढे जाणं हा देखील एक नेतृत्त्वगुणच आहे. त्यासाठी योग्य वेळेची निवड करणं गरजेचं अशतं. मी बराच काळ धोनीच्या मार्गदर्शनाखाली खेळलो आहे. त्यानंतर मीही कर्णधार झालो. पण माझा दृष्टीकोन एकच होता. जेव्हा मी कर्णधार होतो तेव्हाही मी सामान्य खेळाडू प्रमाणेच विचार करायचो, असंही विराट कोहली म्हणाला.