न्यूयॉर्क : फोर्ब्सच्या २०२० च्या यादीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा एकमेव श्रीमंत भारतीय ठरला. विराटची एकूण कमाई २.६ कोटी डॉलर इतकी आहे. कोहली १०० खेळाडूंच्या यादीत ६६ व्या स्थानावर आहे. मागच्यावर्षी तो १०० व्या तसेच २०१८ ला ८३ व्या स्थानावर होता. लॉकडाऊनमुळे क्रीडा विश्व ठप्प झाले आहे. विराट हा पत्नी अनुष्कासह मुंबईत असून घरच्याघरी फिटनेसवर भर देत आहे.
कोहलीने २.४ कोटी डॉलर जाहिराती आणि ब्रॅन्ड या माध्यमातून तर २० लाख डॉलरची कमाई वेतन आणि पुरस्कारातून केली आहे. मागच्यावर्षी त्याने २.५ कोटी डॉलर तर त्याआधी २.४ कोटी डॉलर कमावले होते.महान टेनिसपटू आणि २० ग्रॅन्डस्लॅमचा मानकरी स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर जवळपास १०६.३ मिलियन डॉलर(८०० कोटींहून अधिक)कमाईसह २०२०मध्ये सर्वाधिक कमाई करणाºया खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर आहे. फेडरर हा १९९० नंतर अव्वल स्थान गाठणारा पहिला टेनिसपटू ठरला. (वृत्तसंस्था)फोर्ब्सने शुक्रवारी जाहीर केलेल्या यादीत पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो (१०५ मिलियन डॉलर) , लियोनेल मेस्सी (१०४ मिलियन डॉलर), नेमार (९५.५ मिलियन डॉलर)आणि अमेरिकेचा बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स(८८.२ मिलियन डॉलर) हे अव्वल पाच स्थानावर आहेत. फोर्ब्स १९९० पासून श्रीमंतांची यादी जाहीर करीत आहे.