मुंबई : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेच विक्रम आपल्या नावावर केले होते. आता हे विक्रम मोडण्यासाठी भारताचा कर्णधार विराट कोहली सरसावला आहे. आता तर सचिनच्या एका खास विक्रमापासून कोहली फक्त एक पाऊल दूर असल्याचे दिसत आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांतीवर गेलेला रोहित शर्मा या मालिकेतून टीम इंडियात पुनरागमन करणार आहे.
या सामन्यात कोहलीला सचिनच्या एका विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर याच मालिकेत कोहली सचिनचा हा विक्रम मोडीतही काढू शकतो, असे म्हटले जात आहे. आता हा विक्रम नेमका आहे तरी काय, याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल.
सचिनने आतापर्यंत भारतामध्येही चांगली फलंदाजी केली. दमदार फलंदाजी करताना सचिनने भारतामध्ये २० शतके झळकावली होती. या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आता कोहलीकडे आहे. कारण कोहलीने आतापर्यंत भारतामध्ये १९ शतके झळकावलेली आहे. त्यामुळे आता वानखेडेवर विराटने जर शतक झळकावले तर त्याला सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करता येऊ शकते.
भारताचे संभाव्य अकरा खेळाडू - विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी/ शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया - अॅरोन फिंच ( कर्णधार), डी'आर्सी शॉर्ट, अॅश्टन अॅगर, अॅलेक्स करी ( यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लाबुशेन, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅश्टन टर्नर, डेव्हीड वॉर्नर, अॅडम झम्पा.
वेळापत्रक14 जानेवारी - मुंबई17 जानेवारी - राजकोट19 जानेवारी - बंगळुरू