पोर्ट ऑफ स्पेन: कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी मात केली. या विजयासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यानंतर विराट कोहलीने चहल टिव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला. विराटने या मुलाखतीत सांगितले की, सामन्या दरम्यान पाऊस पडल्यानंतर गर्मी अधिक वाढल्याने 60- 65 धावा केल्यानंतर मी थकलो होतो. परंतु सलामी फलंदाजांची विकेट्स लवकर गेल्याने मला मोठी खेळी खेळणे आवश्यक होती. तसेच प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा निर्धार असतो असे त्याने सांगितले. तसेच देशासाठी खेळण्याची संधी मिळाल्याने प्रत्येक क्षण अनुभवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचप्रमाणे मी जेव्हा कोणतेही संगीत ऐकतो तेव्हा मला नृत्य करावसं वाटतं असे कोहलीने सांगितले.
पहिल्या वन डे सामना दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानातील कर्मचारी सोबत नृत्य करताना दिसून आला होता. त्याच्यासोबत क्रिस गेल व केदार जाधव यांनी देखील कोहलीसोबत नृत्य करत या क्षणाचा आनंद घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.