IND vs ENG ( Marathi News ) : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात निवड झाल्यानंतरही विराट कोहलीने ( Virat Kohli) अचानक माघार घेतली. बीसीसीआयने जाहीर केलेल्या निवेदनात विराट वैयक्तिक कारणास्तव पहिल्या दोन कसोटीत खेळणार नसल्याचे नमूद केले आहे. याचवेळी बीसीसीआयने विराटच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करू नका किंवा काही तर्क लावू नका अशी विनंतीही केली होती. अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याने विराटने ही माघार घेतली असावी असे अनेकांनी मत व्यक्त केले. पण, आता वेगळेच कारण समोर येत आहे.
२५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी सुरू झाली आणि त्याच्या तीन दिवस आधी विराटने माघार घेतल्याचे सांगितले. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतेय आणि त्यानुसार विराटच्या माघारीमागे वेगळंच कारण समोर येत आहे. या पोस्टमध्ये आईची प्रकृती खालावल्यामुळे विराटने माघार घेतल्याचा दावा केला गेला आहे. त्यामुळे विराट तिसऱ्या कसोटीआधी संघात दाखल होण्याचीही शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.
वालीद बिन अब्दुल या व्यक्तिची ही पोस्ट आहे. त्यात विराटच्या आईच्या प्रकृतीचं कारण सांगण्यात आले आहे.
या पोस्टनुसार विराटची आई सरोज यांना सप्टेंबर २०२३ पासून यकृताचा त्रास जाणवत आहे आणि त्यांना गुडगावच्या सीके बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. तरीही विराटने वन डे वर्ल्ड कपला प्राधान्य दिले होते. पण, आता त्याच्या आईची प्रकृती गंभीर असल्याने त्याने तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला गेला आहे.
बीसीसीआयने काय म्हटले होते?बीसीसीआयने त्याच्या निर्णयाचा आदर केला आहे. बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाने स्टार फलंदाजाला पाठिंबा दिला आहे. बीसीसीआयने मीडिया आणि चाहत्यांना विनंती केली आहे की, यावेळी विराट कोहलीच्या गोपनीयतेचा आदर करा आणि त्याच्या वैयक्तिक कारणास्तव अंदाज लावण्यापासून परावृत्त राहा.