Join us  

विराट कोहली आगामी टी-२० विश्वचषकातूनही बाहेर? बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

वेस्ट इंडीजमधील मंद खेळपट्ट्यांचा विचार करून संघाची होणार निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 9:09 AM

Open in App

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती घेणारा माजी कर्णधार विराट कोहली हा आगामी टी-२० विश्वचषकास मुकण्याची शक्यता आहे. ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, कोहली यंदा जूनमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकाबाहेर असेल. विराटचे विश्वचषकात खेळणे निश्चित नाही.

बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषकासाठी संघ पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीबाबत मात्र सर्वच मौन पाळून आहेत. राष्ट्रीय निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी राजकोटच्या एका कार्यक्रमादरम्यान रोहितच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले होते. विराटबाबत मात्र त्यांनी कोहलीच्या भूमिकेवर चर्चा केली जाईल, असे म्हटले होते.

मंद खेळपट्ट्यांवर चाचपडतो कोहली

विराटला का खेळवू नये, याचे ठोस कारण देताना निवडकर्ते म्हणतात, ‘वेस्ट इंडीजमधील खेळपट्ट्या मंद आहेत आणि विराट अशा खेळपट्ट्यांवर चाचपडतो.  त्यामुळे त्याला विश्वचषकापासून दूर ठेवले जाईल. विराटने वेस्ट इंडीजमध्ये ३ टी-२० सामने खेळले. त्यात ३७.३३च्या सरासरीने ११२ धावा केल्या. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. कोहलीने विंडीजमध्ये १९ वनडेत चार शतकांसह ८२५ धावा काढल्या आहेत.

युवा खेळाडूंना संधी

टी-२० विश्वचषकात सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांच्यासारख्या स्टार खेळाडूंना संधी मिळावी, असे निवड समितीला वाटते. हे सर्व जण टी-२०त उपयुक्त मानले जातात. विराटच्या खेळविण्याचा निर्णय बोर्डाला नव्हे, तर राष्ट्रीय निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल.

राहुलचा निर्णय गुलदस्त्यात

निवड समितीने टी-२० विश्वचषकासाठी खेळाडू निवडले असून, यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि लोकेश राहुल यांच्या फिटनेसबाबत शंका कायम आहे. राहुल एनसीएत पुनर्वसन करीत आहे. तो अंतिम संघात खेळेल का, याविषयी शंका कायम असून ध्रुव जुरेल हादेखील यष्टिरक्षकाच्या शर्यतीत आहे.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयविराट कोहली