Virat Kohli emotional note for Cristiano Ronaldo - भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याने दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी एक भावनिक चिठ्ठी लिहिली आहे. ''तू फुटबॉलसाठी जे काही केलं आहेत, ते पाहता तुझ्यापासून कोणतीही ट्रॉफी हिरावून घेतली जाऊ शकत नाही,''अशी पत्राची सुरुवात विराटने केली आहे. कतार येथे सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालला ०-१ अशा फरकाने मोरोक्कोकडून पराभव पत्करावा लागला. ३७ वर्षीय रोनाल्डोचा हा अखेरचा वर्ल्ड कप असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्याला पुन्हा एकदा वर्ल्ड कप ट्रॉफीशिवाय मैदान सोडावे लागले. मोरोक्कोकडून झालेल्या पराभवानंतर रोनाल्डो रडला आणि जगभरातील त्याचे चाहते हळहळले... त्या चाहत्यांपैकी एक विराट कोहलीही आहे...
रोनाल्डो म्हणजे देवाने आपल्याला दिलेलं गिफ्ट आहे आणि तो सर्वकालिन महान खेळाडू असल्याचे विराटने लिहिले... तो लिहितो,' तू या खेळात आणि जगभरातील क्रीडा चाहत्यांसाठी जे काही केले आहे, ते लक्षात घेता कोणतीही ट्रॉफी किंवा कोणतेही जेतेपद तुझ्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तू जेव्हा मैदानावर खेळायला उतरतोस तेव्हा तुझा लोकांवर, माझ्यावर आणि जगभरातील चाहत्यांवर किती प्रभाव आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही.”
"ही देवाने दिलेली देणगी आहे. प्रत्येक वेळी मनापासून खेळ करणार्या, कठोर परिश्रम, समर्पणाचे प्रतीक आणि कोणत्याही खेळाडूसाठी खरी प्रेरणा असलेल्या माणसाला मिळालेले हे खरे आशीर्वाद आहेत. माझ्यासाठी तू सर्वकाळ महान आहेस," असे विराट लिहितो.
पाचवेळा बॅलोन डी'ओर पुरस्कार जिंकणारा रोनाल्डो त्याची पाचवी वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्यासाठी आणि पोर्तुगालला जेतेपद जिंकून देण्यासाठी कतार येथे दाखल झाला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रोनाल्डोला दुसऱ्या हाफमध्ये बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरवले, परंतु त्याला मोरोक्कोसाठी युसेफ एन-नेसिरीने केलेल्या गोलची बरोबरी तो करू शकला नाही.
या पराभवानंतर रोनाल्डो म्हणाला, पोर्तुगालसाठी वर्ल्ड कप जिंकणे हे माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठे आणि महत्त्वाकांक्षी स्वप्न होते. सुदैवाने मी पोर्तुगालसह अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाची विजेतेपदे जिंकली, पण आपल्या देशाचे नाव जगात सर्वोच्च स्थानावर नेणे हे माझे सर्वात मोठे स्वप्न होते. मी त्यासाठी लढलो. या स्वप्नासाठी मी खूप संघर्ष केला. मी १६ वर्षांत पाच वर्ल्ड कप स्पर्धेत खेळलो. नेहमी महान खेळाडूंच्या बाजूने आणि लाखो पोर्तुगीजांच्या पाठिंब्याने, मी माझे सर्व काही दिले. मी कधीही लढाईकडे पाठ फिरवली नाही आणि मी ते स्वप्न कधीच सोडले नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"