Virat Kohli on South Africa Tour, IND vs SA: टीम इंडिया 10 डिसेंबरपासून आपले नवे मिशन सुरू करणार आहे. टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करायचे आव्हान आहे. प्रथम T-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे, ज्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. 26 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. दक्षिण आफ्रिका दौरा आणि विराट कोहली यांचे कनेक्शन पाहता, ही गोष्ट एका घटनेची आठवण करून देते. कारण जेव्हा टीम इंडिया शेवटची दक्षिण आफ्रिकेत गेली होती, तेव्हा विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडले होते. आता या दौऱ्याअंती विराट कोहलीबाबत आणखी एक गोष्ट बोलली जात आहे.
दक्षिण आफ्रिका दौरा सुरू होणार आहे. हा त्याचा शेवटचा विदेश दौरा असू शकतो, असे बोलले जात आहे. म्हणजेच विराट कोहली निवृत्तीकडे वाटचाल करू शकतो अशी चर्चा आहे. आता या दाव्यात कितपत तथ्य आहे आणि विराट कोहली खरोखरच असा धक्कादायक निर्णय घेणार का, हे पाहावं लागेल. पण दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सचं नुकतंच एक वक्तव्य आलं होतं. तो म्हणाला की कदाचित आपण विराट कोहलीला शेवटच्या वेळी दक्षिण आफ्रिकेत खेळताना पाहत आहोत आणि आपण त्याला चांगल्या पद्धतीने निरोप द्यायला हवा. एबी डिव्हिलियर्स विराट कोहलीसोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये बराच काळ खेळत आहे. दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग आहे आणि त्यामुळे तो विराट कोहलीला चांगल्या प्रकारे समजून घेतो. अशा परिस्थितीत त्याचे हे वाक्य सूचक ठरू शकते.
एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, विराट कोहली कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे, त्यामुळे जर त्याने टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतून विश्रांती घेतली असेल तर त्याचा तो अधिकार आहे. त्याला तेवढी मिळायला हवी. पण कसोटीत तो आपला दमदार खेळ दाखवेल, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने यासाठी तयार राहावे. कोहलीचा हा शेवटचा दौरा असू शकतो, त्यामुळे आम्ही त्याला चांगला निरोप देण्यास तयार आहोत.