Virat Kohli Name In Delhi Ranji Trophy Squad : बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाचा स्टार बॅटर विराट कोहली वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच किंग कोहलीचं नाव दिल्लीच्या रणजी संघात झळकलं आहे. रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या हंगामा संदर्भातील ही एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट्स आहे. त्यामुळे आता विराट कोहली खूप वर्षांनी पुन्हा एकदा रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसेल, अशी चर्चा रंगू लागली आहे. जर कोहली रणजी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला तर तब्बल १२ वर्षांनी तो या प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धेत खेळताना दिसेल.
रणजी स्पर्धेसाठी संघात नाव आलं, पण..
रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी दिल्ली संघातील संभाव्य खेळाडूंची जी यादी समोर आली आहे, त्यात विराट कोहलीचं नाव अगदी एक नंबरला असल्याचे दिसून येते. याआधी विराट कोहली २०१२-१३ च्या हंगामात दिल्ली संघाकडून रणजी ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यानंतर २०१९-२० च्या रणजी ट्रॉफी हंगामाच्या वेळीही विराट कोहलीचं नाव दिल्ली संघाच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत दिसले होते. पण तो मैदानात काही उतरल्याचे पाहायला मिळाले नाही.
दुलिप करंडक स्पर्धेत खेळणार असल्याचीही रंगली होती चर्चा
विराट कोहली सध्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात व्यग्र आहे. दोन सामन्यांच्या मालिकेआधी तो दुलिप करंड स्पर्धेत खेळताना दिसेल, अशी चर्चा रंगली होती. पण शेवटी तो या स्पर्धेत खेळताना काही दिसलाच नाही. भारतीय संघ पुढील काही महिने सातत्यपूर्ण क्रिकेट खेळताना दिसेल. त्यामुळे बीसीसीआय विराट कोहलीसंदर्भात काही मोठी रिस्क घेण्याच्या तयारीत नाही, असेही बोलले जाते. रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी दिल्लीच्या संभाव्य संघात त्याचे नाव असले तरी तो पहिल्या टप्प्यात तरी या स्पर्धेत खेळणं मुश्किलच आहे. सध्या विराट कोहली एक एक धाव काढण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यानं लय पकडली तर देशांतर्गत स्पर्धेत खेळण्याचा तो विचारही करणार नाही. पण जर अपयशानं पाठ सोडली नाही तर मात्र तो या स्पर्धेत खेळण्याचा विचार करताना दिसेल.
दिल्लीच्या संघातून इशांत शर्माचा पत्ता कट
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशननं (DDCA ) आगामी रणजी हंगामासाठी तब्बल ८४ खेळाडूंचा समावेश असणारी संभाव्य यादीत तयार केली आहे. पण या यादीत इशांत शर्माचं नाव दिसत नाही. विराट कोहलीशिवाय संभाव्य खेळाडूंच्या यादीत रिषभ पंतच्या (Rishabh Pant) याच्या नावाचाही समावेश केल्याचे दिसून येते. बहुतांश खेळाडू नॅशनल ड्यूटीमध्ये व्यग्र आहेत. याशिवाय फिटनेस चाचणी पार पडल्यावर रणजी स्पर्धेसाठीची अंतिम यादी तयारी केली जाईल, ही गोष्टही डीडीसीएनं स्पष्ट केली आहे.