मुंबई- क्रिकेट विश्वात विराट कोहली आणि एबी डि'व्हीलियर्सचं नाव दुनियेतील सर्वात घातक फलंदाजांच्या यादीत येतं. हे दोन्ही खेळाडू आज दुनियेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये सहभागी आहेत. विराट व डि'व्हीलियर्स दोघंही आयपीएलसाठी रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुकडून खेळतात. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डि'व्हीलियर्स आणि विराट कोहली चांगले मित्र आहेत. आरसीबी संघाचे हे दोघे मजबूत स्तंभ मानले जातात.
विराट कोहली आणि एबी डि'व्हीलियर्स या दोघांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे? या मुद्द्यावरून नेहमीच क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा होत असते. विराट व डि'व्हीलियर्स दोघंही रनमशिन आहेत. त्यामुळे त्या दोघांपैकी एकाला सर्वश्रेष्ठ ठरवणं चाहत्यांनाही कठीण जातं. पण आता विराट कोहलीने स्वतः दोघांपैकी सर्वश्रेष्ठ कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. मला डि'व्हीलियर्स सारखं खेळता येत नाही, असं खुद्द विराट कोहली म्हणाला. आमच्या दोघांमध्ये होणारी तुलना व चर्चा माझ्या नेहमी कानावर येतात. मी सर्व फॉर्ममध्ये खेळू शकतो. पण डि'व्हीलियर्स जसे शॉट्स मैदानावर खेळतो तसं मी खेळू शकत नाही. त्याच्याप्रमाणे नवीन-नवीन शॉट्स खेळता येत नाही.
डि'व्हीलियर्समुळे असलेल्या योग्यतेमुळे व अद्भुत शॉट्स खेळण्याच्या क्षमतेमुळे त्याला जास्त पसंत केलं जातं, असं म्हणत विराटने डि'व्हीलियर्सचं कौतुक केलं आहे. डि'व्हीलियर्स फास्ट बॉलरलाही रिवर स्वीपकरून छक्का मारू शकतो. जे मी आयुष्यात कधी पाहिलं नाही, असंही विराटने म्हटलं.