नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतामध्ये याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही आज होणारा RP-SG इंडियन स्पोर्ट्स हॉनर्स (भारतीय क्रीडा सन्मान) हा पुरस्कार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. या पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष होते. गेल्या वर्षापासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली होती.
गुरुवारी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये भारताच्या ४० जवानांना वीरमरण आले. यानंतर आज होणारा पुरस्कार कोहलीने स्थगित केल्याचे समजत आहे. कोहली याबाबत म्हणाला की, " 'RP-SG इंडियन स्पोर्ट्स हॉनर्स हा पुरस्कार आम्ही स्थगित करण्याचा निर्णय घेत आहोत. सध्याच्या घडीला भारतीय शोकमग्न आहेत, त्यामुळे आम्ही हा पुरस्कार सोहळा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. "
या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारताचा भरवश्याचा फलंदाज चेतश्वर पुजारा, महान महिला बॉक्सर मेरी कॉम आणि भारतातील अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू यांना सन्मानित करण्यात येणार होते. त्याचबरोबर या सोहळ्या बॉलीवूडमधील बरेच सेलिब्रेटीही उपस्थित राहणार होते. या पुरस्कारांमध्ये तडफदार फलंदाज रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांना वर्षातील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. यामध्ये भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचाही समावेश करण्यात आला होता.
या पुरस्कारांतील सर्वोत्तम महिला खेळाडू या विभागासाठी स्मृती मानधना, मिताली राज आणि हरमनप्रीत कौर या क्रिकेटपटूंना नामांकन देण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय महिला संघाची गोलरक्षक सविता पुनियाच्या नावाचाही समावेश करण्यात आला होता. या पुरस्कारासाठी हिमा दास आणि स्वप्ना बर्मन यांनाही नामांकन देण्यात आले होते.
काही दिवसांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा पुरस्कार सोहळा कधी होणार, याबाबत संभ्रम आहे. कारण या मालिकेनंतर आयपीएलच्या तयारीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा पुरस्कार सोहळा नेमका कधी करायचा, हा पेच आयोजकांपुढे असेल.