India vs South Africa 1st test: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या कसोटी सामन्यात ११३ धावांनी पराभूत केले. सेंच्युरियनच्या मैदानावर आशियाई संघाने मिळवलेला हा पहिला कसोटी विजय ठरला. आफ्रिकन संघाच्या फलंदाजांनी सुमार कामगिरी केल्यामुळे त्यांना दोनही डावात दोनशेचा आकडाही गाठता आला नाही. भारताच्या वेगवान माऱ्यापुढे त्यांच्या फलंदाजांनी दांडी गुल झाली. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात पाच बळी टिपले तर दुसऱ्या डावातही तीन गडी माघारी धाडले. त्याच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावरच भारताने सहज विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार विराट कोहली मोहम्मद शमीवर फिदाच झाला. त्याने सामन्यानंतर त्याचं तोंडभरून कौतुक केलं.
"आम्हाला आमच्या गोलंदाजांच्या ताफ्यावर पूर्ण विश्वास होता. ड्रेसिंग रूममध्ये आम्ही यावर चर्चाही केली. पहिल्या डावात गोलंदाजांच्या दुखापतीमुळे आफ्रिकेने थोड्या जास्त धावा केल्या. पण ज्याप्रकारे भारताचे वेगवान गोलंदाज एकत्रितपणे कामगिरी करत आहेत त्यावरून अशाच प्रकारचा विजय अपेक्षित होता. महत्त्वाचं म्हणजे मोहम्मद शमी हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. मला तर असं वाटतं की सध्याच्या घडीला सर्व वेगवान गोलंदाजांच्या यादीत पहिल्या तीन गोलंदाजांमध्ये त्याचा नंबर लागतो. त्याने कसोटीतील २०० बळींचा टप्पा गाठला याचाही मला आनंद आहे. त्याच्यासारखा गोलंदाज नेहमीच प्रभावी मारा करतो आणि संघाला विजय मिळवून देतो", अशा शब्दात विराटने त्याचं कौतुक केलं.
सलामीवीर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनीही शतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरूवात मिळवून दिली होती. त्याबद्दलही विराटने मत मांडलं. "पहिल्या डावात आम्हाला जशी हवी तशी सुरूवात मिळाली. पावसामुळे एक दिवस वाया गेला. तरीही चार दिवसात सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लागला यावरूनच अंदाज बांधता येऊ शकतो की आम्ही किती उत्तम खेळ केला. दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट खेळणं हे नेहमीच आव्हानात्मक असतं. पण आमच्या फलंदाजांनी उत्तम सुरुवात मिळवून दिली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रात आम्ही दमदार कामगिरी करून दाखवली. या साऱ्याचं श्रेय राहुल आणि मयंक यांनाच जातं. त्यांनी पहिल्या दिवशी आम्हाला ३ बाद २७२ ही धावसंख्या गाठून दिली आणि त्यामुळेच आम्ही दमदार कामगिरी करू शकलो", असं विराट म्हणाला.