Virat Kohli Press Conference: भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी चौफेर फटकेबाजी केली. मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत विराट नेमकं काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष्य लागले होते. वन डे कर्णधार पदावरून झालेली हकालपट्टी, रोहित शर्मासोबतचा वाद, वन डे मालिकेत न खेळण्याचा निर्णय आणि BCCIनं दिलेली ४८ तासांची मुदत या सर्व प्रश्नांनी विराटनं त्याच्या भाषेत उत्तर दिली. या पत्रकार परिषदेत ड्राईव्ह, कट, पुल असे सर्व फटके पाहायला मिळाले, परंतु ते शब्दांचे होते. आता विराटनं एवढं धुतल्यानंतर BCCI सायंकाळी प्रेस रिलिज काढणार असल्याची माहिती मिळतेय. हा विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय यांच्या सामन्याचा शुभारंभ आहे का, याची उत्सुकता आला चाहत्यांना लागली आहे.
- बीसीसीआय सूत्र - विराटनं वन डे मालिकेतून विश्रांती मागितली आहे
- विराट - मी कधीच वन डे मालिकेतून विश्रांती मागितली नाही आणि मी निवडीसाठी उपलब्ध आहे,
- सौरव गांगुली - मी स्वतः विराट कोहलीला ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नको अशी विनंती केली
- विराट - मला अशी बीसीसीआय किंवा अन्य कोणाकडून विनंती करण्यात आलेली नाही.
- बीसीसीआय सूत्र - विराटला वन डे कर्णधारपदावरून हटण्यासाठी ४८ तासांची दिली गेली मुदत
- विराट - मला ९० मिनिटांच्या कॉलमध्ये तेही अखेरीस तुला वन डे कर्णधारपदावरून काढलंय असं सांगितलं गेलं
- बीसीसीआय सूत्र - रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्यास विराटचा इन्कार, दोघांमध्ये वाद
- विराट - मी मागील अडीच वर्ष सांगतोय, की आमच्यात काहीच वाद नाही. आता हे सांगून सांगून मी थकलोय.
Virat Kohli Press Conference full text :
- वन डे मालिकेसाठीच्या निवड प्रक्रियेत मी उपलब्ध आहे. माझ्या माहितीनुसार मी नेहमीच उपलब्ध होतो. मी वन डे मालिका खेळणार नाही अशा बातम्या लिहिल्या गेल्या... त्यांचे सूत्र हे विश्वासार्ह नाहीत. त्यामुळे मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा ज्यांनी या बातम्या लिहिल्या त्यांनाच तुम्ही विचारा
- मला टीम इंडियासाठी खेळण्यापासून कोणतीच गोष्ट दूर ठेऊ शकत नाही. बाहेर बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि त्या योग्य नाहीत. पण, मी मानसिकदृष्ट्या तयार आहे आणि दक्षिण आफ्रिकेत खेळण्यासाठी उत्सुक आहे.
- कसोटी मालिकेत रोहित शर्माची उणीव मला जाणवेल. इंग्लंड दौऱ्यावर त्यानं दमदार कामगिरी केली होती. रोहितच्या अनुपस्थितीत मयांक अग्रवालला त्याची छाप पाडण्याची संधी आहे. रवींद्र जडेजाची अनुपस्थिती हा मोठा धक्का आहे. तो लवकर बरा व्हावा या शुभेच्छा
वन डे कर्णधार नाहीस, हे ९० मिनिटांच्या कॉलमध्ये सांगितले
कसोटी संघ निवडण्याआधी निवड समितीची बैठक होण्यापूर्वी मला दीड तास आधी कॉल आला. निवड समिती प्रमुखांनी कसोटी संघाबाबत माझ्याशी चर्चा केली. तो कॉल संपण्यापूर्वी निवड समितीनं मला वन डे कर्णधारपदावर तू नसशील असे सांगितले आणि मी त्यांचा निर्णय मान्य केला. त्याआधी या विषयावर चर्चा झाली नाही. कर्णधार म्हणून मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली.
रोहित शर्मासोबतच्या वादावर
माझ्यात आणि रोहित याच्यात काहीच वाद नाही. मी हे अडीच वर्षांपासून सांगतोय आणि आता मी हे सांगून सांगून थकलो आहे. मी संघाची मान खाली करण्यासाठी काहीच असं करणार नाही. माझ्यात आणि रोहितमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही.