Virat Kohli Gift to Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं विराट कोहलीची एक हळवी बाजू जगासमोर आणली आहे. सचिननं एका मुलाखतीत त्याच्या निवृत्तीवेळीच्या सामन्याची आठवण करुन देत विराट कोहलीसोबतचा एक किस्सा सर्वांना सांगितला. सचिननं त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना नोव्हेंबर २०१३ रोजी वानखेडेवर वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता. या सामन्यानंतर सचिननं क्रिकेट जगतातून निवृत्ती जाहीर केली होती.
भारतीय संघानं सामना एक डाव आणि १२६ धावांनी जिंकला होता. भारतीय संघाच्या विजयानंतर सचिन तेंडुलकर खूप भावूक झाला होता. ड्रेसिंग रुममध्ये एका कोपऱ्यात बसून सचिन डोक्यावर टॉवेल ठेवून खूप रडत होता. त्याच्या डोळ्यांतून येणारे अश्रू काही केल्या थांबत नव्हते. याचवेळीचा एक प्रसंग सचिननं मुलाखतीत कथन केला आहे.
सचिन तेंडुलकरनं अमेरिकन पत्रकार ग्राहम बेंसिंगर यांच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आपल्या अखेरच्या सामन्यातील हा भावूक प्रसंग सांगितला आहे. "कसोटी सामना जिंकल्यानंतर जेव्हा आम्ही ड्रेसिंग रुममध्ये आलो त्यावेळी माझ्या डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबत नव्हते. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता देशासाठी खेळता येणार नाहीय हेच सारखं मनात येत होतं. त्यामुळे डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. मी माझ्या भावनांना रोखू शकत नव्हते. एका कोपऱ्यात डोक्यावर टॉवेल टाकून मी रडत होतो आणि डोळे पुसत होतो. मला आजही आठवतंय त्यावेळी विराट कोहली माझ्या जवळ आला. त्यानं मला एक लाल रंगाचा धागा दिला. जो त्याला त्याच्या वडिलांनी दिला होता. ते पाहून मला खूप भरुन आलं", असं सचिननं सांगितलं.
सचिननं सांगितलं की मी काही मिनिटांसाठीच तो धागा त्याच्याकडे ठेवला आणि विराटला परत केला. "मी त्याला म्हटलं की हे खूप अमूल्य गिफ्ट आहे. ही आठवण तुझ्याकडेच असायला हवी. हे फक्त तुझं आहे आणि इतर कुणाचंही नाही. तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हा धागा तुझ्याकडेच ठेव", असं सांगून मी तो धागा विराटला परत केल्याचं सचिननं सांगितलं. माझ्यासाठी तो खूप भावूक क्षण होता आणि अशा मौल्यवान आठवणी आहेत की ज्या माझ्यासोबत सदैव राहतील असंही सचिननं म्हटलं.
कोहलीनंही केला होता त्याच धाग्याचा उल्लेखदोन वर्षांपूर्वी विराट कोहलीनं याच यूट्यूब चॅनेलसाठी दिलेल्या मुलाखतीत वडिलांनी दिलेल्या लाल धाग्याचा उल्लेख केला होता. वडिलांनी दिलेला लाल धागा मी नेहमी माझ्या मनगटाला बांधून ठेवतो. भारतात बहुतांश लोक असा धागा बांधत असतात. तसंच मलाही माझ्या वडिलांनी धागा बांधला होता. माझ्या वडिलांची ती आठवण होती. म्हणूनच तो मी नेहमी माझ्यासोबत ठेवतो असं विराट कोहलीनं म्हटलं होतं. माझ्या वडिलांनी मला दिलेली ती सर्वात अमूल्य गोष्ट आहे असं मला वाटतं. यापेक्षा अधिक जास्त किमतीचं कोणतंही गिफ्ट मी सचिनला देऊ शकत नव्हतो. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला खूप प्रेरणा देत आला आहात. त्यामुळे हे माझ्याकडून तुमच्यासाठी खूप छोटं गिफ्ट आहे, असं विराट कोहलीनं सांगितलं.