अयाझ मेमन
भारताने प्रथम फलंदाजी करीत आघाडीच्या खेळाडूंच्या बळावर आॅस्ट्रेलियाला ३५३ धावांचे लक्ष्य देणे, यातच वर्चस्व सिद्ध झाले. सलामीच्या सामन्यात शतक झळकविल्याने रोहितबद्दल चिंता नव्हती, पण धवनच्या फॉर्मबाबत शंका होती. त्यानेही शतक ठोकून आॅस्ट्रेलियावर आघात केला. या दोघांच्या प्रेक्षणीय सुरुवातीमुळे कोहली अॅण्ड कंपनीसाठी धावांवर कळस चढविणे सोपे झाले.
राहुलऐवजी चौथ्या स्थानी हार्दिक पांड्याला बढती दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. धोनी आणि जाधव हे देखील त्योवळी रांगेत होते. धवन बाद झाला तेव्हा ४ बाद २२० धावा होत्या. हार्दिकने आपल्या आक्रमक शैलीत २७ चेंडूत ४८ आणि धोनीने १४ चेंडूत २८ धावा ठोकून ३५० चा टप्पा गाठून दिला. या अतिरिक्त धावांमुळे अंतर निर्माण झाले. ओव्हलवर अंतिम ११ जणांचा संघ खेळविताना संयोजन कसे असेल यावर बरीच चर्चा झाली होती. केवळ एक फिरकी गोलंदाज आणि शमीला संधी द्यावी का यावर ड्रेसिंगरुममध्ये बरीच खलबते झाली. संघ व्यवस्थापन विजयी संघ कायम राहिल्यामुळे अखेर लाभ झाला. द. आफ्रिकेविरुद्ध चहल यशस्वी ठरला नव्हता. पण काल कुलदीपच्या सोबतीने मधल्या षटकात प्रतिस्पर्धी फलंदाजांना अक्षरश: बांधून ठेवले होते.
बुमराह व भुवनेश्वर कुमार यांनी अप्रतिम मारा केला. दोघांनीही आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांना घाम फोडला होता. पहिल्या पॉवर प्लेमध्ये वॉर्नरवर गोलंदाजांचे दडपण राहीले. नंतर स्मिथ, ख्वाजा व मॅक्सवेल यांच्याविरुद्ध टिच्चून मारा करीत विजयापासून दूर ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली. कोहलीच्या नेतृत्वाची झलक स्पष्टपणे जाणवत होती. एरवी धोनीच्या सल्ल्यावर विसंबून राहणारा विराट आॅसीविरुद्ध झटपट निर्णय घेत होता. पांड्याला बढती देण्याचा निर्णय त्यातील एक होता. क्षेत्ररक्षणाच्यावेळीही त्याने वेगवान माऱ्याच्या मध्येच फिरकीचा चाणाक्षपणे वापर केला. त्यामुळे आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कोंडी झाली होती. दुसरीकडे केवळ विजयाच्या निर्धाराने खेळणाºया कोहलीने या मोठ्या सामन्यात स्वत:चा मुत्सद्दीपणाही सिद्ध केला.
( लेखक लोकमतचे संपादकीय सल्लागार आहेत )
व्हिडीओसाठी पाहा - www.lokmat.com
Web Title: Virat Kohli proved to be the leader of the leadership
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.