Virat Kohli Ranji Trophy : टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली दीर्घ कालावधीनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. गेल्या १३ वर्षांपासून तो एकही देशांतर्गत सामना खेळलेला नाही. विराट कोहली आता रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे. उद्यापासून दिल्लीचा सामना रेल्वे संघाशी होणार आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या साखळी टप्प्यातील शेवटचा सामना ३० जानेवारीपासून सुरू होणार आहे. दिल्ली आणि रेल्वे संघांमधला हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी दिल्लीकरांना आणि विराटच्या चाहत्यांना मोफत स्टेडियममध्ये एंट्री करता येणार आहे. हे कसं शक्य आहे, जाणून घ्या.
स्टेडियममध्ये फुकटात एन्ट्री कशी मिळणार?
विराटच्या रणजी पुनरागमनासाठी DDCA विशेष तयारी करत आहे. या सामन्यादरम्यान अरुण जेटली स्टेडियममध्ये १०,००० चाहत्यांची आसन व्यवस्था केली जात आहे. विशेष म्हणजे चाहत्यांसाठी मोफत प्रवेशिका ठेवण्यात आली आहे. रणजी सामन्यांमध्ये चाहत्यांसाठी सहसा एक स्टँड उघडला जातो, परंतु या सामन्यासाठी स्टेडियमचे तीन स्टँड खुले ठेवले जाणार आहेत. या सामन्यादरम्यान चाहत्यांना गेट क्रमांक १६ आणि १७ वरून स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल. सुरक्षा तपासणीत पास करून त्यांना जावे लागेल. स्टेडियममध्ये जाण्यासाठी चाहत्यांना त्यांचे आधार कार्ड सोबत आणावे लागेल.
आधार कार्ड आणि सोबत आणखी एक गोष्ट लागणार...
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अशोक कुमार शर्मा यांनी पहिल्या दिवशी किमान १० हजार लोकांची गर्दी अपेक्षित असल्याचे सांगितले आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ते म्हणाले की, गौतम गंभीरचा स्टँड चाहत्यांसाठी खुला असेल. १६ आणि १७ क्रमांकाच्या गेटमधून चाहते प्रवेश करू शकतात. DDCA सदस्य आणि पाहुण्यांसाठी ६ क्रमांकाचे गेट देखील खुले असेल. विनामूल्य प्रवेशिका मिळवण्यासाठी चाहत्यांनी फक्त त्यांचे आधार कार्ड आणि फोटो आयडी प्रूफ सोबत ठेवायचे आहे.