भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याने आशिया चषक २०२२ स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले. १०२१ दिवसानंतर अखेर विराटने ७१वे आंतरराष्ट्रीय व ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर विराटचा परतलेला फॉर्म हा टीम इंडियासाठी चांगले संकेत घेऊन आला आहे. पण, विराटसाठी हा शेवटचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असणार आहे. विराटसह अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याचेही ट्वेंटी-२० संघाकडून खेळण्याचे दरवाजे बंद होणार असल्याचे संकेत BCCI ने दिले आहेत.
एका रिपोर्टनुसार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट व जडेजा यांचे ट्वेंटी-२० संघातून नाव वगळण्यात येणार आहे. त्यामागे या दोघांचे वय व तीनही फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी लागणारी तंदुरुस्ती त्यांच्याकडे राहिल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यात २०२३चा वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन या खेळाडूंवरील भार कमी करण्याचा प्रयत्न बीसीसीआयचा आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ''ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघात संक्रमणाचा काळ सुरू होईल. यात नवीन असे काही नाही. मागील वर्ल्ड कपनंतर मोहम्मद शमीने अन्य दोन फॉरमॅटमध्ये लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले. विराटही आता तरूण राहिलेला नाही. त्याच्यावरील वर्क लोड लक्षात घ्यायला हवा. त्यामुळे बदल आवश्यक आहे, असे आम्हाला वाटते. दुखापत ही जडेजासाठी मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर आम्ही या विषयावर चर्चा करणार आहोत.''
रोहित शर्मा हाही या पंक्तीत येतो, परंतु २०२३च्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत तो टीम इंडियाची धुरा सांभाळणार आहे, असेही बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. ते म्हणाले, २०२३ वर्ल्ड कपपर्यंत रोहितकडे तीनही फॉरमॅटचे कर्णधारपद असले. त्यानंतर आम्ही पुढचा विचार करू. तोही छत्तीशीच्या आसपास आहे आणि तीनही फॉरमॅटचे नेतृत्व करणे त्यालाही नंतर जमणे अवघड आहे. त्यामुळे यावरही ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर विचार होईल. आशिया चषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतरही वर्ल्ड कपमध्ये आमचा संघ चांगला खेळले, असा आम्हाला विश्वास आहे.
आशिया चषक स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ ट्वेंटी-२०, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.