Virat Kohli MS Dhoni, RCB vs CSK: IPL 2025 ही एक अशी स्पर्धा आहे ज्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते विविध गटात विभागले जातात. सोशल मीडियावरही चाहते दंगा करत असतात. इंटरनेटबद्दल म्हणायचे झाले तर विराट कोहलीची RCB आणि महेंद्रसिंग धोनीची CSK हे दोन संघ खूपच लोकप्रिय आहेत. विराट कोहलीचे चाहते चेन्नई सुपर किंग्जला ट्रोल करतात, तर महेंद्रसिंग धोनीचे चाहते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ट्रोल करत असतात. बऱ्याचदा दोन्ही संघांचे चाहते एकमेकांना शिवीगाळही करताना दिसतात. ज्यादिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज सामना असतो, त्या दिवशी सोशल मीडियावर पोस्ट आणि चर्चांचा पाऊस पडल्याचे दिसते. नुकताच दोन संघांचा सामना झाला, त्यात RCB ने बाजी मारली. त्यानंतर आता इन्स्टाग्रामवरही RCB वरचढ ठरली आहे.
RCB च्या संघाने आतापर्यंत एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. पण तरीही गेल्या १८ वर्षांपासून त्यांचा फॅन त्यांच्याशी प्रामाणिक आहे असे म्हटले जाते. विराट कोहली हा भारतातच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील मोठा ब्रँड आहे. त्यासोबतच RCB हा देखील एक मोठा ब्रँड आहे यात वादच नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून धोनीच्या CSK ने इन्स्टाग्रामवर चांगली मजल मारली होती. पण आज ३१ मार्चला RCB फ्रँचाइजीने चेन्नईल मागे टाकत मोठा पराक्रम केला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आज RCB चा एकूण फॉलोअर्सचा बेस हा १७.८ मिलियन झाला आहे. तर CSK यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे १७.७ मिलियन फॉलोअर्स आहेत.
रोहित शर्माची मुंबई इंडियन्सदेखील १६.२ मिलियन फॉलोअर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मध्यंतरीच्या काळात मुंबईच्या संघाने हार्दिक पांड्याला अचानक कर्णधार केले आणि रोहित शर्माला त्या पदावरून दूर केले. त्यावेळी मुंबईच्या अनेक चाहत्यांनी त्यांना अनफॉलो केले होते. त्यामुळे मुंबई या दोन संघापेक्षा बरीच मागे राहिली.