Virat Kohli reaction on Ben Stokes retirement: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेत सर्वांना धक्का दिला. उद्या होणारा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा वन डे सामना हा त्याचा शेवटचा सामना असेल असं त्याने जाहीर केलं. ३१ वर्षीय स्टोक्सने १०४ वन-डे सामने खेळले असून २०१९च्या वर्ल्ड कप विजयात त्याचा मोलाचा वाटा होता. स्टोक्सने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेत असली तरी टी२० आणि कसोटी क्रिकेट खेळातच राहणार असेही त्याने सांगितले. स्टोक्सच्या या तडकाफडकी निर्णयावर भारतीय माजी कर्णधार विराट कोहलीने दिलेल्या प्रतिक्रियेने साऱ्यांचेच लक्ष वेधले.
क्रिकेटचं माहेर असलेल्या इंग्लंडला २०१९ मध्ये पहिला वर्ल्ड कप जिंकता आला. या वर्ल्ड कप विजयात बेन स्टोक्सने मोठी भूमिका बजावली होती. फायनलमध्ये त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कारही पटकावला. न्यूझीलंड विरुद्ध सुपर ओव्हरपर्यंत हा सामना रंगला होता. स्टोक्सने २०११मध्ये आयर्लंडविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या नावावर तीन शतकांसह २,९१९ धावा व ७४ विकेटे्स आहेत. त्याच्या निवृत्तीवर विराटने ट्वीट केले. 'मित्रा, मला तुझ्याबद्दल प्रचंड आदर आहे. आतापर्यंत मी जेवढं क्रिकेट खेळलो, त्यात तुझ्याविरोधात खेळताना मला खूपच चांगलं वाटलं. तुझ्यातील स्पर्धात्मक स्पिरीट कायम तसंच राहू दे', असं विराटने ट्वीट केले.
स्टोक्सने निवृत्ती घेताना काय म्हटले...
"उद्या डरहॅम येथे मी इंग्लंडसाठी अखेरचा वन डे सामना खेळणार आहे. वन डे क्रिकेटमधून मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणे माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होते. इंग्लंड संघातील प्रत्येक खेळाडूसोबत खेळतानाचा मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे. आमचा प्रवास अविश्वसनीय होता. हा निर्णय न पचणारा असला तरी पटणारा नक्की आहे. मी आता या फॉरमॅटमध्ये १०० टक्के योगदान देऊ शकत नाही. त्यामुळे संघातील माझ्याजागी आणखी कोणीतरी चांगला खेळाडू स्थान डिझर्व्ह करतो. तीन फॉरमॅट खेळणे हे आता शक्य नाही. आता माझ्याकडे जे काही आहे ते मला कसोटी क्रिकेटला द्यायचे आहे आणि या निर्णयानंतर मी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करू शकेन, असे मला वाटते. जोस बटलर, मॅथ्यू पॉट्स, अन्य खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा", अशी पोस्ट लिहित त्याने निवृत्तीची घोषणा केली.