नवी दिल्ली : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, संघाचा कर्णधार विराट कोहलीला असे वाटत नाही. वर्ल्ड कप स्पर्धेत कुणी एक फेव्हरिट नाही, सर्वच संघ या शर्यतीत ताकदीनं उतरतात, त्यामुळे भारत हा एकटा दावेदार नाही, असे मत कोहलीनं व्यक्त केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताला घरच्या प्रेक्षकांसमोर 3-2 असा पराभव पत्करावा लागला. तरीही भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास कोहलीनं व्यक्त केला.
आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत भारत आणि इंग्लंड अनुक्रमे दुसऱ्या व पहिल्या स्थानावर आहेत. पण, अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच भारतीय संघाला पराभवाचे पाणी पाजले. डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्हन स्मिथ यांच्या पुनरागमनानंतर ऑस्ट्रेलियाची ताकद आणखी वाढणार आहे.
''प्रामाणिकपणे सांगायचे तर वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक संघ जेतेपदाचा दावेदार आहे. प्रत्येक संघ वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे जो संघ ज्या दिवशी सर्वोत्तम खेळेल, तो बाजी मारेल,'' असे कोहली म्हणाला.