दुबई : क्रिकेटच्या तिनही प्रकारात भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविणाऱ्या विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. यूएईत १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर तो नेतृत्वपदावरुन दूर होणार आहे. वन डे व कसोटी संघाच्या कर्णधारपदी मात्र तो कायम असेल.
विराटने ट्वीटरवर पत्र ट्वीट केले. त्यात त्याने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, कोच रवी शास्त्री आणि सहकारी रोहित शर्मा यांच्यासोबत चर्चा करुन हा निर्णय घेतल्याचे कोहलीने म्हटले आहे.
गेल्या आठ- नऊ वर्षांतील कामाचे ओझे पाहता असे करण्याची गरज होती. मी मागच्या ५-६ वर्षांपासून तिनही प्रकारात नियमितपणे नेतृत्व सांभाळत आहे. वन डे आणि कसोटी संघाचे पूर्णपणे नेतृत्व करण्यासाठी स्वत:ला अधिक ‘स्पेस’ देणे गरजचे वाटत असल्यामुळे मी झटपट क्रिकेटचे नेतृत्व स्वत:कडे ठेवू इच्छित नाही. - विराट कोहली