मुंबई: विराट कोहलीनं टी-२० नंतर कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी विराटला एकदिवसीय सामन्यांचं कर्णधारपद सोडावं लागलं. त्यामुळे आता विराट कोणत्याही प्रकारात भारतीय संघाचं नेतृत्त्व करताना दिसणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाऊनमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर कोहलीनं कर्णधारपद सोडत असल्याची माहिती दिली. तिसऱ्या सामन्यासह भारतानं कसोटी मालिका गमावली.
केप टाऊनमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर कोहलीनं ड्रेसिंग रुममध्ये संघातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. याचवेळी त्यानं आपण कर्णधारपद सोडत असल्याची माहिती इतर खेळाडूंना दिली. याबद्दलचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. मी कसोटीचं कर्णधारपद सोडणार असल्याचं विराटनं संघाला सांगितलं. त्याचा हा निर्णय ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.
मला तुमच्याकडून एक छोटीशी मदत हवीय. राजीनाम्याची माहिती ड्रेसिंग रुमच्या बाहेर जाऊ देऊ नका, असं आवाहन कोहलीनं सहकाऱ्यांना केलं होतं. या बैठकीनंतर २४ तासांनी कोहलीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. विराटच्या राजीनाम्यामुळे त्याच्या चाहत्यांना एकच धक्का बसला. मर्यादित षटकांच्या सामन्याचं नेतृत्त्व विराटकडे नाही. आता त्यानं कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे कोहली आता भारताचं नेतृत्त्व करताना दिसणार नाही.