दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (आरसीबी) जेतेपद पटकावण्यात आलेल्या अपयशासाठी कर्णधार विराट कोहलीचे फलंदाजीतील अपयश कारणीभूत आहे, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केली. विराटला यंदाच्या पर्वात लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले, असे गावसकर यांनी म्हटले आहे. शुक्रवारी अबुधाबीमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एलिमिनेटरमध्ये बँगलोर संघाला सहा गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे बँगलोर संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
गावसकर म्हणाले, ‘कोहलीने स्वत:चा दर्जा उंचावला आहे. ते बघता त्याला या दर्जाची बरोबरी करता आली नाही, असे त्याला स्वत:लाही वाटेल. आरसीबीच्या पराभवासाठी हेसुद्धा एक कारण आहे. गावसकर म्हणाले, ‘कारण ज्यावेळी विराट एबी डिव्हिलियर्सच्या साथीने मोठी खेळी करतो त्यावेळी संघाची धावसंख्याही मोठी होते.’ कोहलीने १२१.३५ च्या स्ट्राईक रेटने १५ सामन्यांत ४५० पेक्षा अधिक धावा केल्या. त्याचा संघ अनेक लढतींमध्ये मधल्या षटकांत धावा फटकावण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले.
गोलंदाजी नेहमीच त्यांची कमकुवत बाजू
गावसकर म्हणाले, ‘आरसीबीची गोलंदाजीची बाजूही कमकुवत होती. त्यामुळे त्यांना प्रतिस्पर्धी संघाला आव्हान देता आले नाही. गोलंदाजी नेहमीच त्यांची कमकुवत बाजू राहिली आहे. या संघात ॲरोन फिंच आहे. तो चांगला टी-२० खेळाडू आहे. युवा देवदत्त पडिक्कलने चांगली सुरुवात करून दिली. संघात विराट कोहली व एबी डिव्हिलियर्सही होते. ’
संघाला फिनिशर खेळाडू शोधावा लागेल. शिवम दुबे या भूमिकेत फिट बसू शकतो, असेही गावसकर म्हणाले. सनरायझर्सविरुद्धचा पराभव आरसीबीचा सलग पाचवा पराभव होता. संघाने आपल्या सुरुवातीच्या १० पैकी ७ सामन्यांत विजय मिळवत चांगली सुरुवात केली होती, पण त्यानंतर मात्र लय गमावली.