India vs South Africa Test series (Marathi News) : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताला आणखी एक धक्का बसला आहे. ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad ) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. ऋतुराजला दुसऱ्या वन डे सामन्यात दुखापत झाली होती आणि तो तिसरा सामना खेळला नव्हता. दुसरीकडे विराट कोहलीला तीन दिवसीय सराव सामन्याला मुकावे लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुराजची दुखापत बरी झाली नसून त्याला भारतीय संघ व्यवस्थापनाने रिलीज केले आहे.
दक्षिण आफ्रिका कसोटीसाठी तो भारतीय संघासोबत दाखल झाला होता, परंतु कौंटुबिक कारणास्तव तो मायदेशी परतला असल्याचे वृत्त समोर येतेय. त्याची फॅमिली इमर्जन्सी नेमकी काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या जोहान्सबर्ग कसोटीपूर्वी विराट परत येणार आहे.
विराट कोहली तीन दिवसांपूर्वी बीसीसीआय व संघ व्यवस्थापनाची परवानगी घेऊन भारतात परतला होता. त्यामुळे त्याला तीन दिवसाच्या सराव सामन्यात खेळता आले नाही. तो आज पुन्हा आफ्रिकेत दाखल होण्याचा अंदाज आहे.
पोर्ट एलिझाबेथ येथे १९ डिसेंबर रोजी यजमानांविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात गायकवाडच्या बोटाला दुखापत झाली होती. "दुसऱ्या वन डे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या बोटाला दुखापत झाली आणि त्यातून तो पूर्णपणे सावरलेला नाही. बीसीसीआय वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली,” असे बीसीसीआयने गुरुवारी तिसरा आणि शेवटचा वन डे सामना सुरू होण्यापूर्वी सांगितले होते. आता तो दोन कसोटींपैकी एकाही सामन्यापूर्वी बरा होण्याची शक्यता नाही आणि संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयशी सल्लामसलत केल्यानंतर त्याला तात्काळ रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली. श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत