मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीची संघातील उपस्थिती किती मह्त्त्वाची आहे, हे सर्वांना माहीत आहे. फलंदाज किंवा यष्टिरक्षक म्हणूनच नव्हे, तर त्याच्यातील नेतृत्वगुणाचा संघाला फायदा होणार आहे. त्याच्या अनुभवाची कर्णधार विराट कोहलीला अधिक मदत मिळणार आहे. त्यामुळेच कोहली निर्धास्त आहे. धोनी संघात आहे, तर चिंता कशाला, असे मत त्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
तो म्हणाला,''धोनीबाबत मी काय सांगू ? त्याच्या मार्गदर्शनाखाली माझ्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली आणि मागील अनेक वर्षांत त्याला जवळून जाणून घेणाऱ्या अनेक खेळाडूंमध्ये मीही आहे. धोनीसाठी संघाच हित हे महत्त्वाचे आहे आणि बाकी सर्व दुय्यम. त्याची ही गोष्ट प्रभावित करणारी आहे. तो नेहमी संघाचा विचार करतो. त्याच्याकडे असलेल्या अनुभवामुळे अन्य संघांच्या तुलनेत भारतीय संघ कुठे उभा आहे हे पाहा? त्याच्यामुळे भारतीय संघ अन्य संघांच्या तुलनेत वरचढ ठरतो. यष्टिमागील त्याच्या कामगिरीने अनेकदा सामन्याचे चित्रच बदलले आहे.''
असे असले तरी धोनीवर सातत्याने टीका होत आहे. त्याच्या धावांचा ओघ मंदावला आहे, तो फिनिशर राहिलेला नाही. त्यामुळे त्याच्या वर्ल्ड कप संघातील समावेशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. कोहलीनं या सर्व चर्चांना दुर्दैवी म्हटले. तो म्हणाला,''धोनीवर टीका होणं दुर्दैवी आहे. लोकांकडे संयम राहिलेला नाही, त्यामुळे ते अशा वायफळ चर्चा करतात. धोनी हा या खेळातील चतुर खेळाडू आहे. यष्टिमागे त्याच्या कामगिरीला मोल नाही. त्याच्यामुळे मला स्वातंत्र्य मिळते. धोनीसारखा अनुभवी खेळाडू संघात असल्याने आत्मविश्वास वाढतो.''
भारतीय संघ 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.