Asia Cup 2023 : आगामी वर्ल्ड कप आणि आशिया चषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी काही फिटनेस प्रोग्राम आखला होता. ९ तासांची झोप, योगा, स्विमिंग, पौष्टिक अन्न.. आदी गोष्टी त्यात होत्या अन् त्यांचे १३ दिवस तंतोतंत पालन करण्याच्या सुचनाही दिल्या होत्या. भारतीय क्रिकेटपटूंना वारंवार होणाऱ्या दुखापतीमुळे ही खबरदारी घेण्यात आली होती. ९ ते २२ ऑगस्ट दरम्यान हा प्रोग्राम होता अन् त्यानंतर भारतीय खेळाडूंची Yo Yo Test घेतली गेली. त्याचा निकाल विराट कोहलीने ( Virat Kohli) जाहीर केला.
९ तासांची झोप, पोहणे, योगा अन्... ! रोहित, विराटसह खेळडूंसाठी 'फिटनेस' प्रोग्राम, पालन न केल्यास...
विराट कोहलीने भारतीय संघाचा कर्णधार असताना खेळाडूंच्या फिटनेसवर सर्वाधिक भर दिला होता आणि त्यानंतर संघात निवड होण्यासाठी यो-यो चाचणी आवश्यक होती. याच कारणामुळे भारतीय संघाची फिटनेस पातळीही गेल्या अनेक वर्षांत सुधारली आहे. टीम इंडियाला आठवडाभरानंतर आशिया कप खेळणार आहे आणि याआधी बंगळुरूमध्ये संघाचे फिटनेस कॅम्प आयोजित करण्यात आले आहे. कोहलीलाही या फिटनेस टेस्टमधून जावे लागले आहे. कॅम्पच्या पहिल्याच दिवशी विराट कोहलीने यो-यो टेस्ट पास केली आहे. कोहलीने स्वतःचा एक फोटो शेअर करून याची माहिती दिली.
यो-यो टेस्टमध्ये त्याने किती गुण मिळवले हे कोहलीने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर सांगितले. विराटने एकूण १७.२ गुण मिळवले. यो-यो चाचणी दीर्घ कालावधीसाठी खेळाडूची ऍथलेटिक क्षमता टिकवून ठेवण्याची क्षमता मोजते. या चाचणीद्वारे खेळाडूची शारीरिक ताकद आणि चपळता तपासली जाते. यो-यो चाचणी दरम्यान खेळाडू किती स्तरांवर उत्तीर्ण होतात यावर आधारित गुण दिले जातात. यापूर्वी, यो-यो चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी बीसीसीआयने निर्धारित केलेला किमान गुण १७ (१६.१ वरून वाढलेला) होता. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांनाही या चाचणीतून जावे लागणार आहे, परंतु अद्याप त्यांचा निकाल समोर आलेला नाही.