नवी दिल्ली: विराट कोहलीनं (Virat Kohli) काही दिवसांपूर्वीच भारताच्या टी-२० संघाचं आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचं नेतृत्त्व सोडण्याचा निर्णय घेतला. टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर विराट भारतीय संघाचं कर्णधारपद सोडेल. तर यंदाची आयपीएल संपल्यानंतर विराट आरसीबीच्या कर्णधारपदावरून पायउतार होईल. कोहलीनं अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानं त्याच्या चाहत्यांना अनपेक्षित धक्का बसला. या निर्णयावर कोहलीनं पहिल्यांदाच एका मुलाखतीमधून स्पष्ट आणि थेट भाष्य केलं आहे.
भारताच्या टी-२० संघाचं आणि आरसीबीचं कर्णधारपद सोडण्यामागे कामाचा भार हेच प्रमुख कारण असल्याचं विराटनं सांगितलं आहे. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत विराटनं यावर अतिशय स्पष्ट आणि मोजक्या शब्दांत भाष्य केलं. 'कोणतंही काम करताना १२० टक्के दिले पाहिजेत, असं मला वाटतं. त्यामुळे कोणतीही जबाबदारी पार पाडताना मी माझे १२० टक्के देतो,' असं विराट म्हणाला.
'कर्णधारपद सोडण्यामागचं सर्वात प्रमुख कारण कामाचा अतिरिक्त भार हेच आहे. माझ्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांबद्दल प्रामाणिक असतो. त्या निभावत असताना मी कधीच अप्रामाणिक नसतो. मला जर वाटत असेल की मी कोणत्या कामात १२० टक्के देऊ शकत नाही, तर मी त्या लोकांप्रमाणे नाही जे त्या जबाबदारी घेऊन बसतात, सोडायला तयार नसतात. मी कोणत्याच गोष्टींशी अशा प्रकारे जोडला गेलेलो नाही आणि याबद्दल माझ्या डोक्यात अतिशय स्पष्टता आहे,' असं विराटनं पुढे म्हटलं.
विराटची आरसीबीसोबतची वाटचाल
कोहलीनं २०१३ मध्ये आरसीबीची धुरा सांभाळली. त्याआधी डॅनिएल व्हिटोरी संघाचा कर्णधार होता. आरसीबीचा संघ चार वेळा प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. एकदा त्यांनी अंतिम फेरी गाठली आहे. मात्र त्यांना जेतेपद पटकावता आलेलं नाही. त्यामुळे कर्णधारपद सोडण्यापूर्वी संघाचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा कोहलीचा प्रयत्न आहे.
Web Title: Virat Kohli Reveals Why He Quit The Captaincy Of Royal Challengers Bangalore And India T20 Team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.