मुंबई : टीम इंडियाने गेल्या एका महिन्यात बरेच चढउतार पाहिले आहेत. पहिल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये अत्यंत खराब कामगिरी केली होती. त्यानंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदावरून विराट कोहली, रोहित शर्मा आणि बीसीसीआयमध्ये वाद निर्माण झाला आहे. विराट कोहलीकडून वनडेचे कर्णधारपद काढून घेत बीसीसीआयने ते रोहित शर्माकडे सोपवले आहे.
दरम्यान, रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता. त्यामुळे विराट कोहलीही वनडे मालिकेतून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. अशा परिस्थितीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात कुठेतरी संघर्ष असल्याचे मीडियातून येत होते, मात्र याबाबत विराट कोहलीने स्वतः पुढे येऊन सांगितले आहे.
'रोहित सक्षम आणि शानदार कप्तान' दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याविषयी चर्चा केली. तो म्हणाला, 'टीम इंडियाला नेहमी योग्य दिशेने घेऊन जाणे ही माझी जबाबदारी आहे. कर्णधार होण्यापूर्वीही माझा नेहमीच हा प्रयत्न होता. माझा हा विचार कधीच बदलणार नाही. रोहित एक सक्षम आणि चांगला कर्णधार आहे. टीम इंडियासाठी आणि आयपीएलमध्ये मुंबई संघाचे कर्णधार असतानाही आम्ही त्याला अनेकदा पाहिले आहे.'
'राहुल आणि रोहितला माझा पूर्ण पाठिंबा' याचबरोबर, विराट कोहली म्हणाला की, राहुल भाई अतिशय हुशार आणि बॅलेंस्ड कोच आणि मॅनेजर आहेत. या दोघांनी संघासाठी कोणतीही रणनीती आखली तरी त्यात माझा पूर्ण पाठिंबा असेल. मी माझे पूर्ण 100% योगदान देईन. टीम इंडियाला योग्य दिशेने नेण्याचे काम मी नेहमीच करेन.
एकदिवसीय मालिका खेळणार विराट कोहली16 डिसेंबरलाच टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. 26 डिसेंबरपासून येथे तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर 19 जानेवारीपासून दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका होणार आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये 11 जानेवारीला विराट कोहलीची मुलगी वामिकाचा वाढदिवस असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे विराट कोहली वनडे मालिकेतून विश्रांती घेऊ शकतो. याबाबत विराट कोहलीनेच सांगितले की, सर्वत्र ज्या गोष्टींबद्दल बोलले जात आहे, ते योग्य नाही. प्रत्येक मालिकेच्या निवडीसाठी मी नेहमीच उपस्थित असतो. एकदिवसीय मालिकेतही खेळणार आहे.