T20 World Cup 2021 मध्ये भारतीय संघांने अतिशय सुमार कामगिरी केली. भारताला आधी पाकिस्तानने १० गडी राखून पराभूत केले. त्यानंतर पाठोपाठ न्यूझीलंडच्या संघानेही टीम इंडियाला धूळ चारली. भारतीय संघातील बहुतांश खेळाडू त्याआधी किमान सात-आठ महिने सतत घरापासून दूर क्रिकेट दौऱ्यांवर होते, त्यामुळे क्रिकेट फॅन्सने खेळाडूंसह BCCI ला देखील या खराब कामगिरीसाठी दोषी ठरवलं. पाकिस्तानच्या संघाने या स्पर्धेत अनपेक्षित दमदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मोक्याच्या क्षणी न्यूझीलंडचा काटा काढत त्यांनी आपला पहिला टी२० विश्वचषक उंचावला. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंवर टीका झाली. तशातच पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने जखमेवर एका अर्थी मीठ चोळण्याचं काम केलं. नुकतंच एका माजी पाकिस्तानी क्रिकेटरने आपल्या पसंतीचा वर्षभरातील सर्वोत्तम टी२० संघ जाहीर केला. मात्र, या संघात त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनाही स्थान दिलं नाही.
पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया आपल्या विविध प्रकारच्या वक्तव्यांमुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. आता मात्र तो एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. २०२१ या वर्षभरात जितके टी२० सामने झाले, त्यातून त्याने त्याच्या पसंतीचा एक टी२० संघ निवडला असून त्या संघात भारताचे दोन बडे खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना स्थान देण्यात आलेले नाही. सलामीवीर म्हणून त्याने पाकिस्तानची जोडगोळी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना संघात घेतलं आहे. मधल्या फळीसाठी जोस बटलर, लियम लिव्हिंगस्टोन या इंग्लंडच्या फलंदाजांना त्याने संधी दिली आहे. त्यांच्यासोबतच टी२० विश्वचषक २०२१च्या फायनलचा हिरो ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श याला संघात स्थान मिळाले आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या जागा मात्र भारताच्या जोडीने पटकावल्या आहेत. कनेरियाने आपल्या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी पसंती दिली आहे. त्यांच्यासोबत फिरकीपटू म्हणून ऑस्ट्रेलियाच्या अँडम झम्पालाही संघात स्थान मिळालं आहे. तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि शाहीन शाह आफ्रिदीच्या खांद्यावर आहे. संघात भारताचा नव्या दमाचा खेळाडू ऋषभ पंत याला राखीव (१२वा) खेळाडू म्हणून स्थान दिलं आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, फायनलमध्ये धडक मारणाऱ्या न्यूझीलंडच्या संघातून एकाही खेळाडू संघात स्थान देण्यात आलेले नाही. तसेच, स्पर्धेचा हिरो ठरलेल्या डेव्हिड वॉर्नरलाही कोहली आणि रोहितप्रमाणेच संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
दानिश कनेरियाने निवडलेला २०२१ चा टी२० संघ- बाबर आझम, मोहम्मद रिझवान, जोस बटलर, लियम लिव्हिंगस्टोन, मिचेल मार्श, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, अँडम झम्पा, जसप्रीत बुमराह, शाहीन शाह आफ्रिदी, ऋषभ पंत (राखीव १२वा खेळाडू)