Sachin Tendulkar on Virat Kohli Rohit Sharma, IND vs SL 1st ODI: भारतीय संघाचे दोन आधारस्तंभ म्हणजे कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली. सध्याच्या घडीला या दोन फलंदाजांना जगभरातील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत गणले जाते. श्रीलंकेविरूद्ध पहिल्या वन डे सामन्यात या दोघांनीही गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. टी२० मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर, रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनी आज दमदार कमबॅक केलं. विराटने शानदार शतक झळकावले. त्याने ११३ धावा कुटल्या. तर रोहित शर्माला शतकाने हुलकावणी दिली, पण त्याने ८३ धावांची अप्रतिम खेळी केली. या दोघांसह सलामीवीर शुबमन गिलनेही शानदार ७० धावा केल्या. भारताच्या या कामगिरी खुद्द क्रिकेटचा देव खुश झाला आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट करत त्यांचे कौतुक केले.
विराट आणि रोहितसह केएल राहुल या तीनही वरिष्ठ खेळाडूंनी आजच्या वन डे मालिकेतून पुनरागमन केले. टी२० मालिकेत या तिघांना विश्रांती देण्यात आली होती. पण आज त्या तिघांनाही संघात संधी मिळाली. केएल राहुलने पुनरागमनाचा फारसा फायदा उचलला नाही. पण कर्णधार रोहित शर्माने ८३ धावा केल्या तर विराट कोहलीने ११३ धावा करत भारतीय चाहत्यांना खुश केले. शुबमन गिलने देखील ७० धावा केल्या. वरच्या फळीतील या तिघांच्या खेळीचं सचिन तेंडुलकरने कौतुक केलं. 'अशाच प्रकारे विराट कामगिरी करत राहा अन् भारताचं नाव जगात आणखी चमकवत राहा. वरच्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या खेळीचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन!', अशा शब्दांत सचिनने ट्विट केले.
दरम्यान, शुबमन आणि रोहित शर्मा यांनी टीम इंडियाला आश्वासक सुरूवात करून दिली. २०व्या षटकात दासून शनाकाने भारताला पहिला धक्का दिला. शुभमन ६० चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांवर बाद झाला. त्याने रोहितसोबत १४३ धावांची भागीदारी केली. रोहितने नंतर फटकेबाजी करत ६७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावा कुटल्या. त्याचे शतक हुकल्याने चाहते नाराज झाले. पण विराटने मात्र दमदार कामगिरी केली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्या दमदार सलामीनंतर विराट कोहलीने वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावले. विराटने ८७ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या साथीने ११३ धावांची खेळी केली.