KL Rahul Press Conference, Virat Kohli: विराट कोहलीने टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आफ्रिकेविरूद्ध विरूद्ध कसोटी मालिकेत संघ पराभूत झाल्यामुळे त्याने तडकाफडकी हा निर्णय घेतला. विराटने याआधीच टी२० आणि वन डे कर्णधारपदही सोडलं होतं. त्याच्या जागी आता रोहित शर्माला निर्धारित षटकांच्या सामन्यांसाठी संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे. असं असलं तरी रोहित सध्या दुखापतग्रस्त असल्याने भारताचे नेतृत्व केएल राहुल करणार असून त्याच्या नेतृत्वाखाली विराट कोहली खेळणार आहे. कर्णधार म्हणून वन डे मालिका सुरू होण्याआधी राहुलने पत्रकार परिषद घेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यातच विराट कोहलीच्या भूमिकेबाबतही त्याने उत्तर दिलं.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली केएल राहुल गेली काही वर्षे खेळतो आहे. मात्र उद्यापासून सुरू होणाऱ्या मालिकेत विराट कोहली राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अशा वेळी विराटची संघातील भूमिका नक्की कशी असेल याबद्दल राहुलने उत्तर दिलं. भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अनेक मोठे विजय मिळवले आहेत. संघाने बरीच प्रगती केली आहे. विराटने यशस्वी नेतृत्व करून त्या पदाची एक उंची प्रस्थापित केली आहे. त्यामुळे संघाला तेथून एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. विराट संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि कायमच राहिल, असं उत्तर राहुलने दिलं.
विराटच्या नंतर आता पुढचा कसोटी कर्णधार कोण असेल? याबद्दलही राहुलने मत व्यक्त केलं. "मी या संदर्भात अद्याप विचार केलेला नाही. जोहान्सबर्गच्या कसोटीत मला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. सामन्याचा निकाल आमच्या बाजून लागला नसला, तरी माझ्यासाठी तो अनुभव खूपच खास होता. मी बरेचदा एखाद्या कर्णधाराकडून जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतलेली आहे. मला जी जबाबदारी मिळेल, ती जबाबदारी मी नीट पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन', असं राहुल म्हणाला.
शिखर धवन संघात खेळणार का? या प्रश्नाचेही राहुलने उत्तर दिले. "शिखर धवन हा खूपच अनुभवी खेळाडू आणि फलंदाज आहे. त्याच्याकडून संघाला काय अपेक्षा आहेत याबद्दल त्याला पूरेपुर कल्पना आहे. मी कर्णधार असताना शिखर धवनला योग्य तो न्याय मिळेल असा मी शब्द देतो", असं राहुल म्हणाला.